
नवी दिल्ली : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतरवर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी तरुण आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात लाठीचार्जमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. या लाठीचार्ज विरोधात आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे निषेध मोर्चा काढला आहे. काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.
काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन
दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे. या आंदोलनात काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जात आहे. जेव्हा मोदी घाबरतात तेव्हा पोलिसांना पुढे करतात, मोदींचा धिक्कार असो, पंतप्रधानांनी राजीनामा द्या... अशा विविध घोषणा काँग्रेसकडून दिल्या जात आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाळ यांनी लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जमिनीवर झोपून आपला निषेध व्यक्त केला आहे.
जहां भी अन्याय होगा, वहां हम खड़े मिलेंगे ✊ pic.twitter.com/XhtroO4Obk
— Congress (@INCIndia) July 21, 2026
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार, पवन खेरा, के.सी. वेगुगोपाळ यांच्यासह काँग्रेसचे अनेक खासदार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
पंतप्रधानांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतर त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी संसद भवन ते पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याची चर्चा केली होती. मात्र दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर यात बदल करण्यात आले.
दरम्यान, काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या घराबाहेर काढण्यात आलेल्या आंदोलनानंतर घोषणाबाजी केली जात आहे. मोदींनी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी होत आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून झालेल्या या आंदोलनानंतर केंद्राकडून राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पाठवण्यात आलं. राहुल गांधी यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.