
मुंबई : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांना पुढील उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.
दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरील आंदोलनस्थळावरून ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शासकीय यंत्रणांवर विश्वास नसल्याचे सांगत पत्नी गितांजली यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी मागितली होती.
याचिकेत सोनम वांगचुक यांना ठेवण्यात आलेल्या विभागात मोठा पोलिस बंदोबस्तासह त्यांच्या भेटीगाठींवर निर्बंध घालण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्यांच्या वैद्यकीय उपचारांबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा केला.
दिल्ली उच्च न्यायालयाने मेदांता रुग्णालयाला वांगचुक यांच्या उपचारांसाठी डॉक्टरांचे विशेष पॅनल स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सफदरजंग रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अहवाल या पॅनलकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहेत. जेणेकरून उपचार प्रक्रिया सुरळीत सुरू राहिल.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की, सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीचे रुग्णालय आणि डॉक्टर निवडण्यास सरकारचा कोणताही विरोध नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीची स्थिती लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध त्यांना डिस्चार्ज देऊ नये, अशी विनंती सरकारने केली.
वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांच्या मतांचा विचार केल्यानंतर वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच वांगचुक यांच्या इच्छेनुसार निवडलेल्या रुग्णालयात उपचार घेण्याचा अधिकारही मान्य केला.