झारखंडमध्ये राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला टेकऑफची परवानगी नाकारल्याने काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या रॅलीमुळे हा निर्बंध लादण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
रांची: टेकऑफची परवानगी नसल्याने झारखंडमध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर सुमारे २ तास थांबले. या घटनेमुळे काँग्रेसने निषेध व्यक्त केला असून, हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
झारखंडच्या शेजारी असलेल्या बिहारमधील जमुई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. ते झारखंडच्या देवघरला विमानाने आले आणि तेथून जमुईला गेले आणि परत देवघरहून विमानाने दिल्लीला जाणार होते. मात्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने २ तास झारखंडच्या काही भागात हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती.
त्यामुळे राहुल गांधी हेलिकॉप्टरमध्येच मोबाइल पाहत बसले होते. यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला असून, 'दुपारी १.१५ वाजता गोड्डाहून निघण्याची राहुल गांधींना पूर्वपरवानगी होती. मात्र अखेरच्या क्षणी इतर नेत्यांची हवाई वाहतूक असल्याचे कारण देत परवानगी रोखण्यात आली. हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित आहे. निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे' अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड
देवघर (झारखंड): झारखंडच्या देवघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करणार असलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते २ तास विमानतळावरच अडकले. नंतर दुसऱ्या विमानाने ते दिल्लीला परतले. देवघरपासून ८० कि.मी. अंतरावर असलेल्या बिहारच्या जमुई जिल्ह्यात ते आदिवासी दिन कार्यक्रमासाठी आले होते.
ते दिल्लीहून देवघरला हवाई दलाच्या विमानाने आले आणि तेथून जमुईला हेलिकॉप्टरने गेले. परत हेलिकॉप्टरने देवघरला येऊन हवाई दलाचे विमान चढले. तेव्हा विमानात बिघाड आढळल्याने विमान उडाले नाही. त्यामुळे २ तास देवघरच्या विमानतळावरच त्यांनी वेळ घालवला. यावेळी कितीही प्रयत्न केले तरी विमान दुरुस्त झाले नाही. म्हणून २ तासांनंतर ते नवी दिल्लीहून पाठवलेल्या दुसऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानाने दिल्लीला गेले.
मोदी देवघरमध्ये अडकल्यावर २ तास झारखंडच्या काही ठिकाणी हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती, असे देवघरचे जिल्हाधिकारी विशाल सागर यांनी सांगितले.
ठाकरेंनंतर शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हेलिकॉप्टर आणि त्यातील बॅगांची शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पालनासाठी हिंगोली जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. अलीकडेच शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आयोगाने तपासणी केली होती. यावर संतापलेल्या ठाकरे म्हणाले होते, 'फक्त माझ्या हेलिकॉप्टरचीच तपासणी का? मोदी, शहांचे हेलिकॉप्टर का तपासत नाही?'
यानंतर शुक्रवारी शहांचे हेलिकॉप्टर आणि त्यातील बॅगांची हिंगोलीत प्रचारासाठी आल्यावर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावर प्रतिक्रिया देताना शहा म्हणाले, 'भाजप निष्पक्ष आणि निरोगी निवडणूक इच्छिते. निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे भाजप पालन करते.'