
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील लाखो ठिकाणी सेवा कार्यांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून 25 वर्षे सातत्याने सेवा केल्याचे त्यांनी नमूद केले. युवक-युवतींना नवीन संधी आणि रोजगार, महिला सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढवण्यासाठी मोदी यांनी काम केल्याचे गोयल म्हणाले. 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीरेषेबाहेर काढल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी यांच्या नेतृत्वात 140 कोटी देशवासीयांच्या सामूहिक प्रयत्नातून ‘विकसित भारत 2047’चा संकल्प साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांनी अनेक वर्षे देशाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना गोयल यांनी केली. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर आणि विविध सेवा उपक्रमांच्या आयोजक व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. संध्याकाळी 7 वाजता ‘आशीर्वादाचा दिवा’ लावून मोदींसाठी प्रार्थना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.