
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील एकता नगरमध्ये ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. हे सर्व प्रकल्प त्यांनी देशाला समर्पित केले.या प्रकल्पांमध्ये सांडपाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्प, आकर्षक रोषणाई (फसाड लायटिंग), नर्मदा घाटाचं नूतनीकरण, आयआरसीटीसी (IRCTC) हॉटेल, आणि एकता नगरमधील रेनफॉरेस्ट, युनिटी आणि इको ट्रेल यांसारख्या कामांचा समावेश आहे.
याशिवाय, मोदींनी गोरा-भद्रा रोडचा विकास, झिरो-वेस्ट स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, खलवानी इको टुरिझमचा विकास आणि कॅक्टस व बटरफ्लाय गार्डनच्या एकात्मिक विकासासह अनेक नव्या प्रकल्पांची पायाभरणीही केली.एकता नगरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणं आणि पर्यटकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं, हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश आहे.तत्पूर्वी, देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी एकता नगरमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे जाऊन त्यांना पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली.
सरदार पटेल यांची जयंती देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी केली जाते. पंतप्रधान मोदींनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत सरदार पटेल यांना अभिवादन केलं. त्यांनी पटेलांचा उल्लेख 'अखंड भारताचे शिल्पकार' आणि 'देशाचे पोलादी पुरुष' असा केला.
मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "अखंड भारताचे शिल्पकार आणि देशाचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एक मजबूत, समृद्ध आणि सक्षम भारत घडवण्यासाठी समर्पित केलं. भारतमातेच्या सेवेतील त्यांचा त्याग आणि समर्पण हे विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे."
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आणि देशवासियांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अमित शाह यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये सरदार पटेल यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटलं आहे. देशातील संस्थानांना एकत्र आणून एकसंध राष्ट्र उभारण्याचं श्रेय त्यांनी पटेलांच्या धैर्याला आणि दूरदृष्टीला दिलं आहे. शाह म्हणाले, “आधुनिक भारताचे शिल्पकार, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रतीक असलेले पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. तसेच सर्व देशवासियांना 'राष्ट्रीय एकता दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.”