कॉक्रोच जनता पार्टीचा आज संसदेवर मोर्चा, जंतर-मंतरवर पोलीस बंदोबस्तात वाढ

Published : Jul 20, 2026, 08:55 AM IST
Cockroach Janta Party CJ Abhijeet Dipke protest at the Jantar Mantar for neet cbse dharmendra pradhan

सार

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत आंदोलनाचे वातावरण तापले आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून आज पोलिसांच्या परवानगीशिवाय मोर्चा काढला जाणार आहे. सध्या जनंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

मुंबई : आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यासाठी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आहेत. संसदेवरही मोर्चा काढला जाणार आहे. पावसाची रिपरिप सुरू असताना मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली आहे. सध्या जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  

जंतरमंतरवर अभिजीत दीपके यांचे उपोषण

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आजपासून जंतर मंतरवर उपोषणाला बसणार आहेत. सकाळपासून आंदोलकांची गर्दी वाढली जात आहे. यावेळी दीपके यांनी आंदोलकांशी संवाद साधताना आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन केले. याशिाय संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला.

परवानगी नसतानाही मोर्चाची तयारी

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांच्या मोर्चाला कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नाही. पोलिसांनुसार, या मोर्चासाठी कोणताही अधिकृत अर्ज आलेला नाही. यामुळे मोर्चा रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासोबत जंतर मंतर परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

जंतरमंतर परिसरात कडेकोट सुरक्षा

सुरक्षेच्या दृष्टीने जंतर मंतरपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

दिल्लीत पावसाला सुरुवात झाली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात आंदोलक गर्दी करत आहेत. पावसात भिजत आंदोलक जंतर मंतरवर ठिय्या देऊन बसले आहेत. संसदेच्या पहिल्या दिवशी सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनाही निमंत्रण

या मोर्चासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आता परवानगीशिवाय मोर्चा पुढे सरकतो की पोलिसांकडून तो रोखला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

PM Modi : नीट पेपर लीक प्रकरणी पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात दगडफेक-तोडफोड; FIR दाखल