Pariksha Pe Charcha 2024 : 'प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास तयार राहा', वाचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून संवाद साधला. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. 

Pariksha Pe Charcha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सोमवारी (29 जानेवारी) 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पालक आणि विद्यार्थ्यांमधील तणाव कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचा होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या काही प्रश्नांवर उत्तरे दिली. याशिवाय दैनंदिन आयुष्यातील काही उदाहरणांच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या मनातील भावना पोहोचवल्या. या कार्यक्रमात अशा काही गोष्टींवरही चर्चा करण्यात आली ज्या केवळ विद्यार्थीच नव्हे एक सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित असतात. 

मोबाइलप्रमाणे स्वत:ला रिचार्ज करा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत म्हटले, ज्या प्रकारे आपण मोबाइलची बॅटरी कमी झाल्यानंतर रिचार्ज करतो, त्या प्रकारे स्वत:ला देखील रिचार्ज करण्याची गरज असते. सुदृढ आरोग्य ठेवण्याकडे लक्ष द्या. याशिवाय बोर्डाची परीक्षा किंवा अन्य कोणतेही शिक्षणादरम्यान झोपेचे महत्त्वही समजून घ्या, पुरेशी झोप घ्या. याशिवाय काही वेळ सूर्यप्रकाशात राहा, संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करण्यासाठी वेळ काढा.

परीक्षेवेळी तणावापासून असे राहा दूर
परीक्षेची वेळ देखील सर्वसामान्य दिवसासारखी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. परीक्षेवेळी अधिक विचार केल्याने तणाव वाढला जातो. परीक्षेआधी तणावापासून दूर राहण्यासाठी टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. आधीपासूनच प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सोडवता येतील याकडे लक्ष द्या. नियमित अभ्यास केल्याने परीक्षेवेळी येणारा ताण कमी होऊ शकतो.

पालक आणि मुलांमधील नाते खेळीमेळीचे असावे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमादरम्यान, पालक आणि मुलांमधील नाते खेळीमेळीचे, विश्वासाचे असावे असे म्हटले. पालक आणि मुलांनी एकमेकांसोबत प्रत्येक गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. जेणेकरुन दोघांमधील संवाद सुधारला जाईल.

सोशल मीडिया आणि गॅजेट्ससाठी वेळ ठरवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुलांनी सोशल मीडिया आणि गॅजेट्ससाठी एक वेळ निर्धारित केली पाहिजे. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दैनंदिन आयुष्यातील एक उदाहरण दिले. पंतप्रधांनी म्हटले की, अधिकाधिक खाल्ल्याने उलटी होते त्याप्रमाणे सोशल मीडियाचा अधिक वापर करणे नुकसानदायक ठरू शकते. घरात काही नियम ठरवले पाहिजेत अथवा नो गॅजेट झोनही (No Gadget Zone) तयार करू शकता. सकारात्मक पद्धतीने मोबाइल आणि गॅजेट्सचा वापर करण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना मोदींनी दिला.

पंतप्रधान स्वत: असा हॅण्डल करतात तणाव
'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांना ते स्वत:चा तणाव कसा हॅण्डल करतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नरेंद्र मोदींनी उत्तर देत म्हटले की, "पंतप्रधान देखील तणावाचा सामना करतात. तणावाला हॅण्डल करण्यासाठी प्रत्येक आव्हानाला प्रतिआव्हान देतात. आव्हाने अनेक आहेत, पण त्यावर तोडगा काढण्याचे मार्गही अनेक आहेत. माझ्यासोबत 140 कोटी जनता आहे. देशाला गरीबीतून बाहेर काढण्याचा आम्ही विचार केला. आज 25 कोटींपेक्षा अधिक जनता गरीबीतून वर आली आहे."

आणखी वाचा : 

Delhi Politics : अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर मोठा आरोप, AAPच्या आमदारांना 25 कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा दावा

Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा, पाहा कर्तव्य पथावरील परेडचा शानदार VIDEO

Lok Sabha Elections 2024 : ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारला या कारणास्तव अल्टीमेटम, नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर

Share this article