Nepal Earthquake : नेपाळवर दुहेरी संकट! महापुरानंतर आता ५.२ तीव्रतेचा भूकंप, १५० हून अधिक जणांचा मृत्यू

Published : Aug 27, 2026, 08:41 AM IST
Nepal Earthquake : नेपाळवर दुहेरी संकट! महापुरानंतर आता ५.२ तीव्रतेचा भूकंप, १५० हून अधिक जणांचा मृत्यू

सार

नेपाळमध्ये महापूर आणि भूस्खलनामुळे आधीच मोठं संकट ओढवलेलं असताना, बुधवारी रात्री ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने देश हादरला. या दुहेरी संकटामुळे १५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : नेपाळवर सध्या एकापाठोपाठ एक संकटं कोसळत आहेत. महापूर आणि भूस्खलनाने (landslide) मोठं नुकसान झालेलं असतानाच, बुधवारी रात्री उशिरा नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ इतकी मोजण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या कोदारी भागापासून सुमारे ५५ किलोमीटर वायव्येला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे किती नुकसान झालं, याची नेमकी माहिती लगेच मिळू शकली नाही. पण ज्यावेळी देशात महापुरामुळे आधीच १५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, त्याचवेळी हा भूकंपाचा धक्का बसल्याने चिंता वाढली आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ४.४ सांगितली होती. मात्र, नंतर USGS ने आपल्या वेबसाइटवर स्पष्ट केलं की, भूस्खलनाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाएवढी होती. याआधी नेपाळच्या एका अधिकाऱ्यानेही भूकंपाच्या शक्यतेमुळेच भूस्खलन झाल्याचं म्हटलं होतं.

तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराचा कहर

तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे १,००० हून अधिक लोक वाहून गेले आहेत. याचा सर्वाधिक फटका रसुवा जिल्ह्याला बसला आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक पर्यटक बेपत्ता असून, त्यात ३०० हून अधिक परदेशी नागरिक आहेत. धक्कादायक म्हणजे, यात १०५ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. या दुहेरी संकटामुळे आतापर्यंत १५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावंच्या गावं वाहून गेली आहेत.

बचावकार्यात मोठे अडथळे

महापूर आणि मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आणखी पुराची भीती, दुर्गम डोंगराळ भाग आणि तुटलेले रस्ते यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. तरीही, बचावकार्य सुरू असून १२ हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस ही मोहीम राबवत आहेत. भारतानेही नेपाळला मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि पथकं पाठवली आहेत.

१०-१२ जिल्हे संपर्काबाहेर

काठमांडूमधील स्थानिक पत्रकार अशोक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुवा, नुवाकोट, सिंधूपाल्चोक आणि चितवनसारख्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे किमान १० ते १२ जिल्हे पूर्णपणे तुटले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. बेपत्ता झालेले लोक कुठे आहेत? कोण सुरक्षित आहे आणि कोण ढिगाऱ्याखाली अडकलं आहे? असे प्रश्न सगळीकडे विचारले जात आहेत. सध्या ढिगारे आणि पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा