
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील प्रचंड विरोधाला न जुमानता, इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून सहा दिवस काम करण्याचे समर्थन केले आहे. काम-जीवनातील संतुलनापेक्षा परिश्रमाला जास्त महत्त्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना मूर्ती म्हणाले, '१९८६ मध्ये आठवड्यातून ६ दिवसांऐवजी ५ दिवसांचे काम करण्याचे धोरण जाहीर झाल्याने मला निराशा झाली होती. मी माझा हा पवित्रा मरेपर्यंत बदलणार नाही.'
देशाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. कठोर व्यावसायिकतेशिवाय देश इतर राष्ट्रांशी स्पर्धा करू शकणार नाही. परिश्रमाचा पर्याय नाही, असे ते म्हणाले.
आपल्या कारकिर्दीच्या प्रवासाचे स्मरण करत त्यांनी सांगितले की, ते दिवसाला १४ तास, आठवड्यातून साडेसहा दिवस काम करायचे. ते त्यांचा दिवस सकाळी ६.३० वाजता सुरू करायचे आणि रात्री ८.४० पर्यंत ऑफिसमध्ये काम करायचे.
परिश्रम हा वैयक्तिक पर्याय नाही, तर तो शिक्षित व्यक्तीने करायला हवे असे कर्तव्य आहे. मला त्याचा अभिमान आहे. कामाची वचनबद्धता ही भारतीय संस्कृतीचा भाग आहे, असे ते म्हणाले. आठवड्यातून ७० तास काम करण्याच्या त्यांच्या सल्ह्याला अनेक उद्योजकांनी पाठिंबा दिला आहे.