३० लाखांच्या पगाराचं गुपित उघड झालं अन्...

मॅट्रिमोनिअल अॅप्लिकेशनवर एका मुलाने पगार ३ लाखांऐवजी ३० लाख लिहिल्याने मुलीने त्याला शिव्या देऊन नातं तोडलं. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मॅट्रिमोनिअल अॅप्लिकेशनवर (Matrimonial application) वधू-वरांना शोधण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या पसंतीचा जोडीदार शोधणारे लोक सुरुवातीला मेसेज (Message) द्वारे माहितीची देवाणघेवाण करतात. काम, पगार, कुटुंब अशी एकेक माहिती शेअर केली जाते. काही वेळा चॅटवर विश्वास ठेवून लोक फसतात. इथे एकाने एक शून्य जास्त टाकल्याने मुलीकडून फटके खाल्ल्याच नाहीत तर नातंच तुटलं. 

सोशल मीडियावर (social media) या दोघांचा चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. किश सिफ नावाच्या व्यक्तीने आपल्या एक्स अकाउंटवर चॅटचा स्क्रीनशॉट (Screen Shot) शेअर केला आहे. पगारातील चूक कबूल केल्यापर्यंत आमचं नातं चांगलंच होतं, असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

चॅटच्या सुरुवातीला मुलगी सांगते की बाबा साखरपुडा कधी करायचा असं विचारत आहेत. त्यावर मुलगा म्हणतो की एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो कारण आपलं दुसरं लग्न आहे. हे ऐकल्यावर मुलगी म्हणते की आपण आधीच खूप बोललो आहोत. आता वाट पाहण्याची गरज नाही. दुसरी मुलगी शोधायची आहे का? यावर मुलगा साखरपुडा कधी करायचा असं विचारतो. नोव्हेंबरमध्ये साखरपुडा करायचा असं मुलगी म्हणते. तेव्हा मुलगा सांगतो की मॅट्रिमोनिअल प्रोफाइलमध्ये एक छोटीशी चूक झाली आहे. ती भेटल्यावर सांगतो असं मुलगी म्हणते. पण मुलगा चॅट पुढे चालू ठेवतो आणि सांगतो की प्रोफाइलमध्ये माझा पगार ३ लाखांऐवजी ३० लाख लिहिला गेला आहे. टायपिंगमध्ये चूक झाली असं तो म्हणतो. हे ऐकल्यावर मुलीचा मूड बदलतो आणि ती त्याला शिव्या देऊ लागते. मुलाने आईसोबतचा चॅटही शेअर केला आहे.

ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ४ लाखांपेक्षा जास्त वेळा ही पोस्ट पाहिली गेली असून २.५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ती तुम्हाला नाही तर तुमच्या पगाराला लग्न करत आहे. तिच्याशी लग्न करण्यापेक्षा ऑफिसमध्ये झोपणं बरं असं एका युजरने म्हटलं आहे. काहींनी स्त्रीवादावर टीका केली आहे. आजकालच्या मुली पगाराला महत्त्व देतात. घरात काम करत नाहीत, आईवडिलांची काळजी घेत नाहीत, मुलं नको असतात. स्त्रीवाद हा महिलांसाठी घातक आहे असं काहींनी म्हटलं आहे. 

दुसरं लग्न करण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी नीट तपासा. पोटगी, पगार, काम याबद्दल माहिती असू द्या. एकदा सोनं मिळालेल्या व्यक्तीला पुन्हा सोनंच हवं असतं असं एका कमेंटमध्ये म्हटलं आहे. एका युजरने आपल्या मित्राच्या आयुष्यात घडलेली घटना सांगितली आहे. घटस्फोटित मित्राला प्रेम करणारी मुलगी त्याला अपार्टमेंट घेण्यास सांगत होती. हे घर तिच्या नावावर करावं असा तिचा आग्रह होता. हे नाकारल्यावर तिने लग्न मोडलं. 

Share this article