नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले आहे. त्यांनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान असताना त्यांचे निवासस्थान ७ रेसकोर्स रोडवर होते. नंतर, पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर, ते लुटियन्स दिल्लीच्या मोतीलाल नेहरू रोडवरील बंगला क्रमांक ३ मध्ये स्थलांतरित झाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग १० वर्षे येथे राहीले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या भव्य टाइप-८ बंगल्यात मनमोहन सिंग राहायला आले होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आधी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे अधिकृत निवासस्थान होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी हे निवासस्थान रिकामे केले होते. समोर आलेल्या अहवालानुसार, शीला दीक्षित यांचे 2019 मध्ये 81 व्या वर्षी निधन झाले होते.
माजी पंतप्रधान असल्यामुळे मनमोहन सिंग यांना त्यांच्या कुटुंबासोबत एसीपीजी सुरक्षा पुरवण्यात आली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सरकारने ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्यावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत, कारण त्यांची एक मुलगी अमेरिकेतून येत आहे, तिची सध्या प्रतीक्षा केली जात आहे. केंद्रीय कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, एक शोकप्रस्तावही पारित करण्यात आला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिव दर्शनासाठी काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी उपस्थित होते. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली.