उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याने 'या' चर्चेला उधाण!

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी झालेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Rameshwar Gavhane | Published : Aug 8, 2024 7:22 AM IST

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत. आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची देखील घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल. मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटीनंतर तेच महाविकास आघाडीचा चेहरा असणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना, भाजपचा टोला

उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असणार का? अशी चर्चा रंगलेली असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे पहिले आम्हाला चिडवायचे की, तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात. आज त्यांच्यावर देखील हीच परिस्थिती आली आहे. तीन दिवस दिल्लीत जावे लागले आहे. अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना करावी लागते. तरी इतर दोन मित्र हे सांगायला तयार नाही की तेच मुख्यमंत्री असतील. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

आणखी वाचा :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणूक 'अ‍ॅक्शन प्लॅन'

Share this article