Ram Mandir Ayodhya: राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. पण पत्राच्या माध्यमातून त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घेऊया त्यांनी पत्रामध्ये लिहिलेल्या खास गोष्टी…
Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा विधिवत पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. दरम्यान राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.
पण त्यांनी राम मंदिर उभारणीसंदर्भात लिहिलेले खास पत्र समोर आले आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी पत्रामध्ये नेमके कोणत्या खास गोष्टी नमूद केल्या आहेत, जाणून घेऊया.
“राम मंदिर हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न”
लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीस लिहिले आहे की, “माझ्याकडे शब्द नाहीत. श्री राम मंदिर उभारणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न होते. 22 जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आयुष्यात मी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे, हे माझे भाग्य आहे”.
"राम मंदिर आंदोलन हे राजकीय प्रवासातील निर्णायक घटना"
“मंदिराची उभारणी झाल्यानंतर रामजन्मभूमीसाठीचे आंदोलन सार्थकी ठरले. स्वातंत्र्यानंतर राम मंदिर आंदोलनामध्ये परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले. राम मंदिर आंदोलन हे माझ्या राजकीय प्रवासातील सर्वात निर्णायक घटना होती. या आंदोलनामुळे मला भारत देशाचा नव्याने शोध घेण्याची संधी मिळाली. सोमनाथ ते अयोध्या या राम रथयात्रेच्या रूपामध्ये नशिबाने मला एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली”, असेही अडवाणी यांनी पत्रात म्हटले आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाचे मंदिर बांधणे हे भाजपचे केवळ स्वप्न नव्हते, तर ते एक मिशनही होते. 1980च्या दशकात अयोध्या मंदिराचा मुद्दा चर्चेत आला".
रथयात्रेच्या निर्णयाची घोषणा
अडवाणी यांनी राम रथयात्रेच्या आठवणींना उजाळा देत लिहिले आहे की, “12 सप्टेंबर 1990 रोजी पत्रकार परिषद आयोजित केली आणि 10 हजार किलोमीटर अंतर प्रवासाची रथयात्रा काढण्याचा माझा निर्णय जाहीर केला. 25 सप्टेंबर रोजी सोमनाथ येथून यात्रा सुरू होऊन 30 ऑक्टोबर रोजी अयोध्येमध्ये पोहोचेल व यानंतर अयोध्येतील कारसेवेमध्ये यात्रा सहभागी होईल, असे आंदोलनाशी संबंधित असलेल्या संतांनी नियोजन केले होते. 25 सप्टेंबर हा दिवस माझ्यासाठी खास होता, कारण या दिवशी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे”.
अडवाणींना करण्यात आली अटक
लालकृष्ण अडवाणी यांची राम रथयात्रा 24 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात दाखल होणार होती. मात्र 23 ऑक्टोबर रोजी बिहारमधील समस्तीपूर येथे त्यांना अटक करण्यात आली. येथे एका बंगल्यामध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अडवाणी यांना पाच आठवडे नजरकैदेत ठेवण्यात आले.
"…या दोघांचे आभार मानतो"
अडवाणी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, “माझ्या श्री राम रथास 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून ते आतापर्यंत बरेच काही घडले. यामध्ये कायदेशीर लढाईचाही समावेश होता. अखेर 30 सप्टेंबर 2020 रोजी तीन दशकांनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने माझी व माझ्या सहकाऱ्यांची विविध आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या पत्रामध्ये त्यांनी दोन व्यक्तींचे विशेष आभार मानले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मी खूप खूश आहे. आता राम मंदिरही बांधले गेले आहे. या प्रवासात मला साथ दिल्याबद्दल स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी आणि माझी दिवंगत पत्नी कमला यांचे आभार मानतो”.
आणखी वाचा :
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, पहाटेच्या पहिल्या आरतीचा पाहा VIDEO
Ram Mandir : हिरे-माणिक यासारख्या रत्नांनी सजलेली रामललांची मूर्ती