Bharat Ratna to LK Advani : माझा व माझ्या आदर्श-तत्त्वांचा हा सन्मान - लालकृष्ण अडवाणी

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, “हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझे आदर्श आणि तत्वे यांसाठी देखील ही सन्मानाची बाब आहे."

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्न मिळणारे हे पन्नासावे व्यक्ती आहेत. देशाचा सर्वोच्च सन्मान असणारा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भावपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना 96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, “हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझे आदर्श आणि तत्वे यांसाठी देखील ही सन्मानाची बाब आहे."

आयुष्याने मला जे काही काम सोपवले ते मी नि:स्वार्थपणे पूर्ण केले.

भारतरत्न स्वीकारल्यावर लालकृष्ण अडवाणी म्हणाले की हा सन्मान केवळ एक व्यक्ती म्हणून त्यांच्यासाठीच नाही तर ते ज्या आदर्शांवर आणि तत्त्वांवर कायम ठाम राहिले त्यांचाही सन्मान आहे. अडवाणी म्हणाले की,“ आज मला मिळालेला 'भारतरत्न' हा सन्मान मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नाही तर माझ्या क्षमतेनुसार मी आयुष्यभर ज्यांची सेवा केली त्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून सामील झाल्यापासून मी माझ्या प्रिय देशासाठी समर्पित राहिलो आहे आणि केवळ निःस्वार्थ सेवेलाच पुरस्कार मानले आहे. देशसेवेसाठी आयुष्याने माझ्यावर जे काही कार्य सोपवले ते पूर्ण करण्यासाठी मी कायम समर्पित राहिलो आहे.”

भारतरत्न मिळवणारे तिसरे भाजप नेते

लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्न मिळवणारे तिसरे भाजप नेते आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे दोन्हीही नेते अडवाणींना समकालीनच होते. या दोन्हींही नेत्यांनी अडवाणींच्या खांद्याला खांदा लावून कार्य केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून जाहीर केली आनंदाची बातमी

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. ही आनंदाची बातमी जाहीर करताना ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 

आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेल्या अडवाणीजींचे भारताच्या विकासातील योगदान अविस्मरणीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचा जीवनप्रवास राहिला आहे. आपले गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचे संसदीय कार्य नेहमीच अनुकरणीय राहिलेले आहे.”

आणखी वाचा -

LK Advani : BJPचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, PM नरेंद्र मोदींची घोषणा

Bharat Ratna to LK Advani : अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव, CM शिंदेंकडून लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर होतोय देशभरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव

Share this article