
मुंबई : दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये गोडवा वाढवण्यासाठी जोधपूरमधल्या एका मिठाईच्या दुकानाने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. त्यांनी खास लहान मुलांसाठी आणि मिठाई प्रेमींसाठी 'फटाका स्वीट्स' नावाने एक नवीन व्हरायटी बाजारात आणली आहे. या मिठाईचा आकार अगदी खऱ्याखुऱ्या फटाक्यांसारखा असल्याने सध्या बाजारात याचीच चर्चा आहे. यामध्ये सुतळी बॉम्ब आणि अनारच्या आकारातील गोड पदार्थांचा समावेश आहे.
हे दुकान दिवाळी, होळी आणि रक्षाबंधन अशा सणांना ग्राहकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतं. याबद्दल ANI शी बोलताना मोहक यांनी सांगितलं की, "सणांच्या निमित्ताने लहान मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी खास बनवण्याची आमची कल्पना होती. आता दिवाळी आली आहे, त्यामुळे आम्ही सर्वांसाठी एक नवीन आणि वेगळी मिठाई आणली आहे. होळी असो, दिवाळी असो वा रक्षाबंधन, सणांच्या काळात बाजारात काहीतरी हटके आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. 'फटाका स्वीट्स' हे त्याचंच एक छोटंसं उदाहरण आहे."
मोहक यांनी पुढे सांगितलं की, ही मिठाई उत्तम दर्जाचे काजू, पिस्ता आणि बदामापासून बनवली जाते. प्रत्येक व्हरायटी वेगळी दिसावी म्हणून त्यांना फटाक्यांचा आकार दिला आहे. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, "तुम्ही याला छोटा गोड बॉम्ब म्हणू शकता, तर दुसरा प्रकार अनारसारखा आहे, ज्याला आम्ही गोड अनार म्हणतो."
या खास मिठाईला ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दुकानात माल येताच तो हातोहात विकला जात असल्याचं मोहक यांनी सांगितलं. "आम्ही याला फक्त 'फटाका स्वीट्स' न म्हणता 'स्वीट धमाका' म्हणतोय, जो फक्त 'जोधपूर मी स्वीट्स'मध्येच मिळेल. या दिवाळीत लोकांनी आमच्याकडे येऊन या वेगळ्या मिठाईचा आनंद घ्यावा," असं आवाहन त्यांनी केलं. पारंपारिक मिठाईला फटाक्यांचा लूक देऊन या दुकानाने ग्राहकांची दिवाळी आणखी खास बनवली आहे.