WhatsApp Ticket : व्हॉट्सॲपवर पाठवलेला स्क्रीनशॉट तिकीट म्हणून चालणार नाही

Published : Jul 12, 2026, 11:20 AM IST
WhatsApp Ticket : व्हॉट्सॲपवर पाठवलेला स्क्रीनशॉट तिकीट म्हणून चालणार नाही

सार

भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार, आता व्हॉट्सॲपवर आलेला तिकिटाचा स्क्रीनशॉट किंवा फोटो प्रवासासाठी वैध मानला जाणार नाही. फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण ज्यांना रेल्वेची फसवणूक करायची नाही, त्यांच्यासाठी ही अडचण होणार नाही.

नवी दिल्ली : ट्रेन प्रवासासाठी व्हॉट्सॲपवर आलेला तिकिटाचा फोटो किंवा स्क्रीनशॉट वापरता का? मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने स्पष्ट केलंय की, व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलेलं तिकीट किंवा त्याचा स्क्रीनशॉट आता प्रवासासाठी वैध पुरावा मानला जाणार नाही. तिकीट तपासणीदरम्यान (TTE) असे फोटो स्वीकारले जाणार नाहीत, असं रेल्वेने ठणकावून सांगितलं आहे. अनेक जण ऑनलाइन तिकीट बुक केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवतात किंवा कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना व्हॉट्सॲपवर पाठवतात. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा महत्त्वाचा खुलासा केला आहे.

रेल्वेने नेमकं काय म्हटलंय?

तिकीट तपासणारे TTE आता व्हॉट्सॲपवर आलेले तिकिटाचे फोटो, स्क्रीनशॉट किंवा इतर कोणतेही फोटो स्वीकारणार नाहीत. प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत बुकिंग प्लॅटफॉर्मवरून मिळालेलं मूळ ई-तिकीट किंवा रेल्वे काउंटरवरून खरेदी केलेलं छापील तिकीटच दाखवावं लागेल. व्हॉट्सॲपवर आलेला फोटो दाखवून प्रवास करता येणार नाही, हे रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

स्क्रीनशॉट का चालणार नाहीत?

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, स्क्रीनशॉट किंवा फॉरवर्ड केलेल्या फोटोंमध्ये सहज बदल (editing) करता येतो आणि बनावट तिकीट तयार केलं जाऊ शकतं. एकच फोटो अनेक जण वापरून त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते. शिवाय, अशा फोटोंची सत्यता लगेच तपासणंही अवघड असतं. ही फसवणूक टाळण्यासाठीच TTE आता मूळ बुकिंग रेकॉर्डसोबत माहितीची पडताळणी करतात.

तिकीट तपासणीवेळी कोणती कागदपत्रं सोबत ठेवावीत?

ई-तिकीट वापरून प्रवास करणाऱ्यांनी खालीलपैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवणं बंधनकारक आहे:

  • IRCTC Rail Connect ॲपमधील मूळ ई-तिकीट.
  • तिकीट बुक करताना आलेला कन्फर्मेशन SMS.
  • अधिकृत बुकिंग ॲप किंवा वेबसाइटवर उपलब्ध असलेलं मूळ तिकीट.
  • गरज वाटल्यास ई-तिकिटाची प्रिंट काढलेली कॉपी.
  • तिकिटावरील माहितीशी जुळणारं सरकारमान्य फोटो ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड).
  • तिकिटावरील नाव आणि ओळखपत्रावरील नाव सारखंच असायला हवं, अशीही रेल्वेची सूचना आहे.

फक्त स्क्रीनशॉट असेल तर काय होईल?
जर प्रवाशाकडे फक्त व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट किंवा फॉरवर्ड केलेला फोटो असेल, तर TTE त्याला विनातिकीट प्रवासी समजू शकतो. अशा परिस्थितीत प्रवाशाला नवीन तिकीट काढावं लागू शकतं, दंड भरावा लागू शकतो किंवा रेल्वेच्या नियमांनुसार इतर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.

व्हॉट्सॲपवर तिकीट शेअर करू शकतो का?

हो, तुम्ही तिकिटाची माहिती तुमच्या सोयीसाठी कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना व्हॉट्सॲपवर पाठवू शकता. पण तो फोटो प्रवासासाठी पुरेसा पुरावा नाही. जो व्यक्ती प्रवास करत आहे, त्याच्याकडे मूळ ई-तिकीट किंवा बुकिंग कन्फर्मेशन असणं अनिवार्य आहे.

प्रवासापूर्वी काय लक्षात ठेवावं?

प्रवासात कोणताही त्रास टाळण्यासाठी मोबाईलमध्ये मूळ ई-तिकीट सेव्ह करा, बुकिंगचा SMS जपून ठेवा, सरकारमान्य फोटो ओळखपत्र सोबत ठेवा, मोबाईलमध्ये पुरेशी चार्जिंग आहे याची खात्री करा आणि केवळ स्क्रीनशॉट किंवा व्हॉट्सॲप फोटोंवर अवलंबून राहू नका, अशा सूचना भारतीय रेल्वेने दिल्या आहेत. ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या या काळात सर्वच प्रवाशांनी हा नियम लक्षात घेणं गरजेचं आहे. मूळ तिकीट सोबत असेल, तरच तुम्ही विनाकारण होणारा दंड आणि मनस्ताप टाळू शकता.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Robinhood Stock: ट्रुइस्टने वाढवले टार्गेट, वॉल स्ट्रीटवरही चर्चा
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न! कालीघाटमधील धक्कादायक घटना