Indian Railway : वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव वेगळाच आनंद देऊन जातो. आता तर यासंदर्भात आणखी एक बातमी आहे, ती म्हणजे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी-हावडा दरम्यान धावणार आहे. त्यानतर हैदराबाद-दिल्ली सेवा सुरू होईल.
वंदे भारत ट्रेनने भारतीय रेल्वेमध्ये एक क्रांती घडवून आणली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच जुन्या ट्रेन, तेच डबे, त्याच सीट... भारतीय रेल्वेबद्दल लोकांची हीच धारणा होती. पण वंदे भारत ट्रेनच्या आगमनाने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. केवळ वेगच नाही, तर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या वंदे भारतला नव्या पिढीची ट्रेन म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. आता अशीच वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन तेलुगू राज्यांमध्ये धावणार असल्याची माहिती आहे.
24
दिल्ली-सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत स्लीपर...
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षाची भेट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. आसाममधील गुवाहाटी रेल्वे स्टेशन ते पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशन दरम्यान पहिली ट्रेन धावेल आणि उद्घाटन समारंभ जानेवारी 2026 च्या मध्यात किंवा शेवटी होईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे. वंदे भारत स्लीपरची ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण झाली असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
पण दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हैदराबादमध्ये धावणार आहे. देशाची राजधानी दिल्ली ते तेलंगणाची राजधानी हैदराबाद दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. या दोन शहरांदरम्यान दररोज हजारो लोक प्रवास करतात. त्यांचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी ही लक्झरी ट्रेन चालवली जाणार असल्याचे समजते.
34
वंदे भारत स्लीपरची ही आहेत वैशिष्ट्ये..
ही ट्रेन सध्या धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनप्रमाणेच अतिशय वेगाने धावेल. तिचा वेग ताशी 180 किलोमीटर असेल. सामान्य वंदे भारत ट्रेनमध्ये आपण फक्त बसून प्रवास करू शकतो, पण नवीन स्लीपर कोच ट्रेनमध्ये आरामात झोपून प्रवास करण्यासाठी आरामदायक बर्थ आहेत. त्यामुळे ही वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन लांब पल्ल्याचा प्रवास जलद आणि आरामदायक बनवते.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये 16 कोच आणि 823 प्रवाशांची क्षमता असेल. या ट्रेनमध्ये सेन्सर-आधारित दरवाजे, ऑटोमॅटिक डोअर्स, उत्तम सस्पेन्शन आणि कमी आवाज करणारे तंत्रज्ञान आहे. सुरक्षेसाठी 'कवच' प्रणाली आणि इमर्जन्सी टॉक-बॅक सिस्टीम आहे. वंदे भारतमध्ये मॉडर्न टॉयलेट्ससोबतच अत्याधुनिक सॅनिटेशन तंत्रज्ञानही असेल.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी वंदे भारत स्लीपरची टेस्ट रन आधीच घेतली आहे. हा प्रवास किती सुरळीत होता हे दाखवण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. वंदे भारत स्लीपर 180 किमी प्रतितास वेगाने धावत असतानाही ग्लासमधील पाणी सांडेल इतकाही धक्का बसला नाही, असे दाखवणारा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी ही ट्रेन खूप आरामदायक असेल आणि स्लीपर प्रवासाला एक नवीन अर्थ मिळेल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.