EPFO: EPF ही भारत सरकारची नोकरदारांसाठी एक सुरक्षा बचत योजना आहे. पीएफची रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावा लागतो. यासाठी एक मोठी प्रक्रिया असते. पण आता ही प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. लवकरच एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याचे दिवस येणार आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढण्यासाठी आतापर्यंत एक मोठी प्रक्रिया होती. ऑनलाइन अर्ज, व्हेरिफिकेशन आणि वाट पाहण्याची वेळ येत असे. या समस्येवर तोडगा म्हणून EPFO ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2026 पासून ATM द्वारे PF रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
25
डेबिट कार्डप्रमाणे काम करणारे EPFO चे विशेष कार्ड
या नवीन पद्धतीत EPFO सदस्यांना एक विशेष कार्ड देणार आहे. हे बँकेच्या डेबिट कार्डप्रमाणे काम करेल. हे कार्ड वापरून ATM मधून थेट PF खात्यातून पैसे काढता येतील. सरकारच्या मते, पीएफचे पैसे ही कर्मचाऱ्यांची स्वतःची संपत्ती आहे. आपत्कालीन परिस्थितीत ते पैसे उपलब्ध असले पाहिजेत. या दिशेने EPFO ने बँका आणि RBI सोबत चर्चा पूर्ण केली आहे. आवश्यक तांत्रिक प्रणालीही तयार केल्याची माहिती आहे.
35
कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
या निर्णयामुळे देशभरातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. EPFO च्या आकडेवारीनुसार, 2014 मध्ये सदस्यांची संख्या फक्त 3.3 कोटी होती. त्यावेळी फंडाचे मूल्य 7.4 लाख कोटी रुपये होते. सध्या EPFO फंडाचा आकार 28 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. दरमहा सुमारे 7.8 कोटी कर्मचारी पीएफमध्ये पैसे जमा करत आहेत. सदस्य संख्या वाढल्याने क्लेम व्यवस्थापन EPFO साठी एक आव्हान बनले आहे. ATM सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना त्वरित पैसे मिळतील आणि EPFO वरील कामाचा भारही कमी होईल.
ATM मधून पैसे काढण्याच्या मर्यादेवर अद्याप स्पष्टता नाही
ATM द्वारे PF रक्कम काढण्याची संधी मिळाली तरी त्यावर एक मर्यादा असणार आहे. एका वेळी किती रक्कम काढता येईल? महिन्याला किती पैसे काढण्याची परवानगी असेल? यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पैसे काढण्याच्या मर्यादेवर लवकरच स्पष्टता दिली जाईल. सुरक्षा आणि फंडाची स्थिरता लक्षात घेऊन हे नियम बनवले जातील.
55
EPFO चे नियम आणखी सोपे होण्याच्या दिशेने
अलीकडच्या काळात EPFO आपले नियम हळूहळू सोपे करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटची मर्यादा 5 लाख रुपये केली होती. यामुळे आजारपण, लग्न आणि इतर आपत्कालीन गरजांसाठी लवकर पैसे काढण्याची सोय झाली. आता ATM द्वारे PF काढण्याची सुविधा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांसाठी हा एक 'गेम चेंजर' ठरेल. आपत्कालीन परिस्थितीत बँकांमध्ये फिरायची गरज न पडता त्वरित आर्थिक मदत उपलब्ध होईल.