
Ind vs Pak Asia Cup 2025 Final : भारतीय संघाने (Team India) आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तिलक वर्मा (Tilak Verma) सामन्याचा हिरो ठरला, तर रिंकू सिंहने (Rinku Singh) अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केलं. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडियाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावलं.
अंतिम सामन्याइतकाच नाट्यमय प्रसंग पारितोषिक वितरणावेळी घडला. एसीसी (Asian Cricket Council) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते आशिया चषक आणि पदकं स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पारितोषिक वितरण सोहळा जवळपास तासाभराने सुरू झाला. समालोचक सायमन डूल यांनी सांगितलं की, भारतीय खेळाडूंच्या भूमिकेमुळे सोहळा लवकर गुंडाळावा लागला.
भारतीय खेळाडू तिलक वर्मा, अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपली वैयक्तिक पारितोषिकं इतर मान्यवरांकडून स्वीकारली. मात्र, ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघ ठाम नकार देत राहिला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं मात्र उपविजेतेपदाचा धनादेश नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. त्यामुळे समारंभात एसीसी अध्यक्षांचा चेहरा पडलेला दिसून आला.
मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असल्याने भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन किंवा फोटोशूट टाळले होते. फायनलनंतरही हीच भूमिका कायम ठेवत भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. अखेरीस नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाबाहेर गेले, तर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवायच सेलिब्रेशन साजरे केले.
“मी क्रिकेटमध्ये इतका काळ आहे, पण विजेत्या संघाने ट्रॉफी नाकारलेली ही पहिलीच वेळ पाहिली. ट्रॉफी न घेतली तरी माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे आमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आहेत. आमच्या मेहनतीने आणि आठवणींनीच आम्हाला खरी जिंक मिळाली,” असे सूर्यकुमार यादवने सांगितले.