
Swami Chaitanyananda Saraswati : लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चैतन्यानंदला आग्र्यातून अटक केली आहे. चैतन्यानंदला दिल्लीत आणले जाईल. १७ मुलींनी चैतन्यानंद विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात दिल्ली पतियाळा हाऊस न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. तो अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असून फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर जामीन अर्ज फेटाळण्यात आला. लैंगिक शोषणाव्यतिरिक्त, बनावट कागदपत्रे तयार करण्यासारखे गुन्हे चैतन्यानंदवर दाखल असल्याचे सांगत पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला. पुरावे नष्ट करण्याची आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तक्रारी समोर आल्यानंतर फरार झालेल्या चैतन्यानंदचा पोलीस शोध घेत होते. याच दरम्यान त्याला अटक करण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चैतन्यानंदची आलिशान कार जप्त केली होती. जप्त केलेल्या कारमधून आरोपी मुलींना ऋषिकेशला घेऊन जात असल्याची माहिती आहे. बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली दुसरी कार पोलिसांनी यापूर्वी जप्त केली होती. दरम्यान, मुलींच्या जबाबाचे अधिक तपशील समोर आले आहेत. आरोपीने मुलींच्या हॉस्टेलच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, असा जबाब मुलींनी पोलिसांना दिला. यातील फुटेज आरोपीच्या फोनवर उपलब्ध होते, असेही मुलींचे म्हणणे आहे.
श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्या विरोधात १७ मुलींनी जबाब दिला आहे. आश्रमातील पीजी डिप्लोमाच्या (पीजीडीएम) विद्यार्थिनींनी ही तक्रार दिली आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांवरही आरोप आहेत. ४ ऑगस्ट रोजी वसंतकुंज पोलिसांकडे स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्या विरोधात तक्रार आली. विद्यार्थिनींनी संचालकांविरोधात प्रशासकाकडे तक्रार केली होती. श्री शारदा इन्स्टिट्यूटच्या प्रशासकीय समितीमधील एका व्यक्तीनेच पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले. त्यापैकी १७ जणींनी संचालकांविरोधात जबाब दिला. शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवणे असे जबाब विद्यार्थिनींनी दिले आहेत.
संस्थेतील कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप आहेत. स्वामी चैतन्यानंद सरस्वती सांगतील त्याप्रमाणे वागण्यासाठी तीन महिला कर्मचारी आणि प्रशासकाने दबाव आणला, असा विद्यार्थिनींचा जबाब आहे. त्यानंतर पोलिसांनी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तपासणी केली. पूर्वी स्वामी पार्थसारथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर २००९ आणि २०१६ मध्येही लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. ओडिशाचे रहिवासी असलेले स्वामी चैतन्यानंद सरस्वती गेल्या १२ वर्षांपासून या आश्रमात राहत आहेत.