Farooq Abdullah Assassination Attempt : जम्मूतील एका लग्न समारंभात फारुख अब्दुल्ला यांच्यावर अगदी जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. आरोपी कमल सिंह जामवाल सीसीटीव्हीमध्ये पिस्तूल रोखून धरताना दिसतोय. Z+ सुरक्षा असूनही तो इतक्या जवळ कसा पोहोचला?
Farooq Abdullah Assassination Attempt: जम्मूतील एका लग्न समारंभात सुरक्षेचा मोठा गोंधळ उडाला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना जम्मूच्या पॉश ग्रेटर कैलाश भागातील हॉटेल रॉयल पार्कमध्ये घडली, जिथे अनेक मोठे नेते आणि पाहुणे हजर होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती अचानक मागून येतो आणि फारुख अब्दुल्लांच्या अगदी जवळ जाऊन पिस्तूल रोखतो. पण, तो काही करण्याआधीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
26
आरोपी कोण आहे आणि त्याने काय दावा केला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव कमल सिंह जामवाल असून तो ६३ वर्षांचा आहे. तो जम्मूच्या पुरानी मंडी परिसरात राहतो. शहराच्या जुन्या भागात त्याची काही दुकानं आहेत आणि तो भाड्यावर आपला उदरनिर्वाह करतो. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, तो गेल्या २० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचा विचार करत होता. हा त्याचा “पर्सनल अजेंडा” होता, असं तो म्हणाला. त्याने ज्या पिस्तुलाचा वापर केला, ती त्याची परवानाधारक बंदूक असल्याचंही त्याने सांगितलं. मात्र, पोलिसांनी अजून या दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही आणि प्राथमिक तपासात कोणताही दहशतवादी संबंध समोर आलेला नाही.
36
CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण आणखी गंभीर झालं आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, आरोपी गर्दीतून हळूहळू पुढे येतो आणि फारुख अब्दुल्लांच्या जवळ पोहोचून अचानक पिस्तूल काढून त्यांच्यावर रोखतो. पण त्याचवेळी तिथे असलेल्या सुरक्षा टीमने तात्काळ हालचाल करत आरोपीला पकडलं. त्यामुळे गोळी लागण्यासारखी कोणतीही मोठी घटना घडली नाही.
यावेळी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे सुद्धा कार्यक्रमात उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला आणि उपमुख्यमंत्री एका नॅशनल कॉन्फरन्स नेत्याच्या मुलाच्या लग्नासाठी आले होते. दोन्ही नेते कार्यक्रमात जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ होते आणि त्यांनी पाहुण्यांशी संवादही साधला.
56
ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, त्यांचे वडील थोडक्यात बचावले. Z+ सुरक्षा असूनही एखादी व्यक्ती इतक्या जवळ कशी पोहोचली, हा गंभीर प्रश्न आहे, असं ते म्हणाले. क्लोज प्रोटेक्शन टीमने तात्काळ कारवाई केल्यामुळे हा हल्ला फसला, असंही त्यांनी सांगितलं.
66
ही सुरक्षेतील मोठी चूक आहे का?
उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी या घटनेला सुरक्षेतील मोठी चूक म्हटलं आहे. जेव्हा इतके मोठे नेते एखाद्या कार्यक्रमात हजर असतात आणि कुणी व्यक्ती शस्त्र घेऊन आत पोहोचते, तेव्हा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे, असं ते म्हणाले. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याचं पिस्तूल जप्त केलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.