वर्षभरात 2 कोटी नोकऱ्या, गरीबांना मोफत 200 यूनिट वीज; केजरीवाल यांच्या देशातील जनतेला 10 गॅरंटी

तुरुंगातून सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. आज अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला.

 

नवी दिल्ली: तुरुंगातून सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. आज अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला. देशभरातील गरीबांना 200 यूनिट मोफत वीज देण्यात येईल. देशातील नागरिकांना वर्षभरात 2 कोटी नोकऱ्या देण्यात येतील, अशी घोषणा करतानाच केजरीवाल यांनी देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या. यावेळी त्यांनी मोदींच्या गॅरंटीची पोलखोलही केली. मोदींनी प्रत्येक व्यक्तीला 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. ती कधीच पूर्ण केली नाही. दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं, तेही हवेतच विरलं. त्यांनी 2022पर्यंत बुलेट ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. तेही पूर्ण केलं नाही, असा हल्लाच अरविंद केजरीवाल यांनी चढवला.

केजरीवाल यांच्या देशाला 10 गॅरंटी

1. विजेची हमी: देशभरात पहिल्या 200 युनिट वीज मोफत 24 तास वीज पुरवठा.

2. शिक्षणाची हमी: सर्वांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्याचे आणि सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगल्या बनवण्याचे आश्वासन.

3. आरोग्याची हमी: खाजगी रुग्णालयांच्या बरोबरीने सरकारी रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा आणि सुविधा निर्माण करणे.

4. चीनकडून जमीन परत मिळवण्याची हमी: भारताची जमीन चीनपासून मुक्त केली जाईल, लष्कराला मोकळा हात दिला जाईल.

5. अग्नीवीर योजना संपवण्याची हमी: नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेली अग्निवीर योजना रद्द केली जाईल.

6. एमएसपीची हमी: शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत दिली जाईल.

7. राज्यत्वाची हमी: दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा सुनिश्चित केला जाईल.

8. रोजगाराची हमी : दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याची योजना आहे.

9. भ्रष्टाचाराविरुद्ध हमी : भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षित स्वर्ग देण्याच्या धोरणातून मुक्ती, देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन.

10. GST वर हमी: वस्तू आणि सेवा कर (GST) सुलभ करण्याच्या योजना, चीनची व्यापार क्षमता ओलांडण्यावर लक्ष आहे.

Share this article