
दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर भाष्य केले. गेल्या चार वर्षांपासून आपण आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आहोत, मात्र ते आतापर्यंत काही बोलले नाहीत आणि FIR झाल्यानंतरच त्यांनी आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे का सांगितले, असा प्रश्न सतीश सालियन यांनी उपस्थित केला. आपल्याकडे मोबाइल टॉवर लोकेशन, फोटो आणि व्हिडिओसह पुरावे असल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला. योग्य वेळ आल्यावर हे सर्व पुरावे बाहेर येतील, असेही त्यांनी म्हटले. पुढील कारवाई तपास यंत्रणा करतील आणि त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्याशी स्वतः चर्चा करण्याची इच्छा नसून आता आपले वकील आणि न्यायालयच त्यांच्याशी बोलतील, असे सतीश सालियन म्हणाले. आदित्य ठाकरे खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिशा सालियन कामाशी संबंधित तणावाच्या गोष्टी घरी सांगत नव्हती, त्यामुळे ती कोणाला भेटत होती किंवा आपण ज्या व्यक्तींची नावे घेत आहोत त्यांच्याबद्दल दिशाने आपल्याशी कधीही चर्चा केली नव्हती, असेही सतीश सालियन यांनी सांगितले. कामामध्ये दिशा अत्यंत हुशार होती, असेही त्यांनी म्हटले.