एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर 80 वर्षीय व्यक्तीला व्हील चेअर न दिल्याने कार्यवाही करण्यात आली आहे.
Air India : देशातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. खरंतर, मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एका 80 वर्षीय वृद्ध प्रवाशाला व्हील चेअर न दिल्यासंबंधित हे प्रकरण आहे. या प्रकरणात वृद्धाला व्हिलचेअर न दिल्याने पायी चालावे लागले आणि त्याचा मृत्यू झाला होता.
मुंबई विमानतळावर 12 फेब्रुवारीला 80 वर्षीय बाबू पटेल यांचा मृत्यू झाला होता. बाबू पटेल आपल्या 76 वर्षीय पत्नी नर्मदाबेन पटेल यांच्यासोबत न्यूयॉर्क (New York) येथून मुंबईत आले होते. या प्रकरणात दखल घेतल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) धाडली होती. या नोटीसला सात दिवसात उत्तर द्यावे असेही सांगण्यात आले होते. याशिवाय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने प्रश्न उपस्थितीत करत म्हटले की, वृद्ध दांपत्याने व्हील चेअरचे बुकिंग करूनही त्यांना का देण्यात आली नाही?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून विमानतळांची तपासणी सुरू
मुंबईसह काही विमानतळांवर प्रवाशांच्या गरजा पाहता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून तपासणी सुरू केली आहे. विमानतळावर कोणत्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहिल्यास देशभरातील वेगवेगळ्या विमान कंपन्या प्रवशांबद्दल गंभीर नाहीत. खरंतर हा एक चिंतेचा विषय आहे.
गेल्या महिन्यात उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हैदराबाद येथील विंग्स इंडिया 2024 कार्यक्रमाला संबोधित करत म्हटले होते की, वर्ष 2030 पर्यंत देशातील विमानाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 30 कोटींच्या आसपास होऊ शकते. अशातच वृद्धाला व्हील चेअर न दिल्याच्या चुकीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
आणखी वाचा :
मुंबई विमानतळावर व्हील चेअर न मिळाल्याने दीड किलोमीटर पायी चालत गेलेल्या वृद्धाचा मृत्यू