Delhi Crime : दिल्लीत मणिपूरच्या संगीतकाराची हत्या, किरकोळ वादातून जमावाकडून मारहाण

Published : Sep 08, 2026, 08:32 AM IST
Delhi Crime : दिल्लीत मणिपूरच्या संगीतकाराची हत्या, किरकोळ वादातून जमावाकडून मारहाण

सार

दिल्लीतील किलोकरी गावात एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मणिपूरच्या ५४ वर्षीय निवृत्त संगीतकाराचा मृत्यू झाला. सी. विक्रम सिंह असं त्यांचं नाव असून, काही डिलिव्हरी बॉईज आणि ढाबा कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली होती.

मुंबई : दिल्लीतील किलोकरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मणिपूरचे रहिवासी असलेले ५४ वर्षीय निवृत्त संगीतकार सी. विक्रम सिंह यांचा मारहाणीत मृत्यू झाला. सोमवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह यांच्या घरासमोर काही डिलिव्हरी बॉईज आणि ढाब्यावरील कर्मचारी आरडाओरडा करत होते. सिंह यांनी त्यांना शांत राहण्यास सांगितल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, काही अल्पवयीन मुलांसह सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कुटुंबीयांचा अमानुष मारहाणीचा आरोप, न्यायाची मागणी

या घटनेनंतर दिल्लीत राहणाऱ्या मणिपूरच्या नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. सिंह यांच्या एका नातेवाईकाने आरोप केला आहे की, "स्थानिक लोकांनी त्यांना मारूनच टाकलं. ते मणिपूरचे रहिवासी होते. त्यांना इतकी अमानुष मारहाण केली की ते जागेवरून हलूही शकत नव्हते. आम्ही एफआयआर दाखल करण्याआधीच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं," असं त्या म्हणाल्या.

त्यांनी पुढे सांगितलं, "हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं. त्यांना सीपीआर द्यावा लागला. सहा प्रयत्नांनंतर त्यांच्या श्वासात थोडी हालचाल दिसली, पण त्यानंतर त्यांचं रक्ताभिसरण आणि हृदयाचे ठोके मंदावत गेले. सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी त्यांच्या पत्नीचा फोन आला की त्यांचं निधन झालं आहे. पोलिसांनी घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आहे. या फुटेजमधून आरोपींची ओळख पटेल. आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना कोठडी सुनावण्यात येणार आहे. ईशान्य भारतातील लोकांवर होणारा अन्याय थांबवून आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्हाला अशा अमानुष हल्ल्यांपासून आणि वंशभेदापासून स्वातंत्र्य हवं आहे. प्रशासन आम्हाला न्याय मिळवून देईल, अशी आशा आहे."

ABVP कडून घटनेचा निषेध, कठोर कारवाईची मागणी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) सुद्धा 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. एबीव्हीपीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "दिल्लीत मणिपूरचे नागरिक चोंगथम विक्रम सिंह यांच्या निर्घृण हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. कोणताही वाद अशा हिंसेचं समर्थन करू शकत नाही. या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी व्हावी, प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित व त्यांच्या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळावा, अशी आमची मागणी आहे. एबीव्हीपी पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभी आहे. न्यायाला उशीर होता कामा नये.” या मारहाणीमागील नेमकं कारण काय आणि आरोपींची यात काय भूमिका होती, याचा पोलीस तपास करत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले, पण भारतात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव किती?
धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community