
दिल्ली : सरकारी निवासस्थान रिकामा करण्यावरून सुरू झालेल्या चर्चांवर माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिले असून, आपल्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त मुलींच्या आरोग्याच्या गरजा हे विलंबाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड सध्या ५ कृष्णा मेनन मार्गावरील टाईप ८ बंगल्यात राहतात.आता त्यांना तीन मूर्ती मार्गावरील नवे निवासस्थान देण्यात आले असून, ते पुढील दोन आठवड्यांत सध्याचा बंगला रिकामा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलींच्या आरोग्यासाठी घरात ICU
न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या प्रियंका आणि माही या दत्तक मुली अत्यंत दुर्मिळ अशा नेमलाइन मायोपॅथी या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांनी सांगितले की, “माझ्या मुली आता १६ आणि १४ वर्षांच्या आहेत, त्यांना खास सुविधा आणि गोपनीयतेची गरज आहे. आमच्या घरात एक छोटं ICU सेटअप आहे.” याआधी त्यांच्या एका मुलीला श्वास घेण्यास त्रास झाल्याने ४४ दिवस आयसीयू मध्ये ठेवावं लागलं होतं. त्यामुळे सध्याच्या बंगल्यातील काही मूलभूत सुविधा — जसे की बाथरूमच्या दाराचा आकार व्हीलचेअरच्या अनुकूल असणे — या त्यांच्या आवश्यक गरजांपैकी आहेत.
नवीन घर तयार नसल्यामुळे अडचणी
तीन मूर्ती मार्गावरील नवे निवासस्थान दोन वर्षांपासून रिकामं होतं आणि बरीच दुरुस्ती गरजेची होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले की, “ठेकेदाराने जूनपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगितले होते.पण अजून थोडे काम बाकी आहे. म्हणून आम्ही सध्या फक्त रोज वापरण्यात येणारे फर्निचर वापरतोय, बाकी सगळं सामान पॅक केलं आहे.”
बाजारभावाने भाडे द्यायची तयारी
सरन्यायाधीश पदावरून नोव्हेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर आठ महिने झाले असूनही, त्यांनी बंगला रिकामा न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे याबाबत पत्र पाठवले होते. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं की त्यांनी बाजारभावाने भाडं भरण्याची तयारी दाखवली होती. ते म्हणाले, “मी न्यायमूर्ती भूषण गवई यांना सांगितले की काही दिवस राहण्याची परवानगी दिली तर बरे होईल. परवानगी मिळाली नाही तरी मी भाडे भरण्यास तयार आहे.”
भाड्याने घर मिळणंही कठीण
माजी सरन्यायाधीश म्हणाले की, “तीन महिन्यांसाठी भाड्याने घर घेण्याचा विचार केला होता, पण इतक्या कमी कालावधीसाठी घर भाड्याने देण्यास कोणी तयार नव्हतं. त्यामुळे आम्ही बंगला रिकामा करण्यास थोडा वेळ घेत आहोत.” त्यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनाही बंगल्यात राहण्यास विनंती केली होती, परंतु त्यांनी नकार दिला.