
मध्य रेल्वेने आता तिकीट तपासणी अधिक कडक केली आहे. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या काळात रेल्वेने एक विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात प्रामुख्याने तिकिटाची वैधता, सवलती, रिझर्व्हेशन कोटा आणि रेल्वे पास यांची कसून तपासणी केली जाणार आहे.
तुम्ही जर एकाच तिकिटावर कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्रवास करत असाल, तर आता जास्त काळजी घ्यावी लागेल. एका तिकिटावर अनेक प्रवाशांची नावे असतील, तर त्यापैकी किमान एका प्रवाशाकडे स्वतःचे मूळ ओळखपत्र (Original ID) असणे आवश्यक आहे. जर कोणाकडेच मूळ ओळखपत्र नसेल, तर त्या तिकिटावरील सर्व प्रवाशांना 'विनातिकीट' मानले जाईल. त्यानंतर रेल्वेच्या नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
तिकीट दरात सवलत घेणाऱ्या प्रवाशांना आता फक्त तिकीट दाखवून चालणार नाही. सवलतीसाठी पात्र असल्याचे सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे प्रवासादरम्यान सोबत ठेवावी लागतील. रिझर्व्हेशन कोट्यातून तिकीट मिळवलेल्या प्रवाशांचीही रेल्वे अधिकारी सविस्तर तपासणी करतील. अधिकाऱ्यांनी विचारल्यास सवलत किंवा विशेष कोट्याची मूळ कागदपत्रे दाखवणे बंधनकारक असेल.
रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय जेव्हा ई-पास किंवा पॅसेंजर ऑर्डर तिकिटावर प्रवास करतात, तेव्हा त्यांनीही मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे सक्तीचे आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ई-पास किंवा पॅसेंजर ऑर्डर तिकिटाचे अधिकृत ट्रॅव्हल ऑथॉरिटीमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे. असे न केल्यास त्यांनाही विनातिकीट प्रवासी मानून कारवाई केली जाऊ शकते.
विनातिकीट किंवा अनधिकृत प्रवास करणाऱ्यांसाठी किमान दंड आता २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला आहे. हा दंड तिकीट दराव्यतिरिक्त भरावा लागेल.
रिझर्व्हेशन तिकिटांसोबतच जनरल (अनरिझर्व्हड) तिकिटांची तपासणीही कडक केली जाईल. तिकीट खरे आहे की नाही याबाबत शंका आल्यास, तपासणी अधिकारी 'तिकीट एक्झामिनर ॲप' (Ticket Examiner App) वापरून माहिती तपासून पाहतील.
प्रवासादरम्यान ओळखपत्राच्या झेरॉक्सऐवजी मूळ ओळखपत्र (Original ID) सोबत ठेवा. सवलत आणि विशेष कोट्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जवळ बाळगा. ई-पास किंवा पॅसेंजर ऑर्डर तिकीट प्रवासापूर्वी अधिकृत ट्रॅव्हल ऑथॉरिटीमध्ये बदलून घ्या. तिकीट तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करा आणि त्यांनी मागितलेली कागदपत्रे त्वरित दाखवा. रिझर्व्हेशनचा गैरवापर, सवलतींचा चुकीचा वापर आणि रेल्वे पासचा गैरवापर रोखणे, हाच या महिनाभर चालणाऱ्या विशेष तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.