
Budget 2026 : भारताच्या संसदीय इतिहासात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नेहमीच अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत देशाचा आर्थिक आराखडा मांडतात आणि त्यातून पुढील वर्षाची दिशा ठरते. पण या अर्थसंकल्पीय भाषणांनी केवळ धोरणात्मक निर्णयच नाही, तर अनेक विक्रमही घडवले आहेत. आजवरच्या इतिहासात सर्वात मोठे भाषण आणि सर्वात लहान भाषण देणारे अर्थमंत्री कोण होते, याबद्दल जाणून घेणे रंजक ठरते.
भारताच्या इतिहासातील सर्वात दीर्घ अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना तब्बल 2 तास 40 मिनिटे भाषण केले. हे भाषण सुमारे 20 हजार शब्दांचे होते, जे आजवरचे सर्वात मोठे बजेट भाषण मानले जाते.
या भाषणात अर्थव्यवस्था, शेती, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कर सुधारणा आणि सामाजिक कल्याण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. विशेष म्हणजे भाषणाच्या शेवटी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी उर्वरित मजकूर सभागृहात न वाचता लेखी स्वरूपात सादर केला होता. तरीही हे भाषण भारतीय संसदीय इतिहासातील सर्वात लांब भाषण म्हणून नोंदले गेले.
देशातील सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी केले होते. त्यांनी 1977 मध्ये मोरारजी देसाई सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. हे भाषण केवळ 20 ते 30 मिनिटांचे होते आणि त्यात अंदाजे 800 शब्दच वापरण्यात आले होते.
त्या काळात देशात राजकीय अस्थिरता होती आणि तात्पुरत्या सरकारकडून मोठे आर्थिक निर्णय अपेक्षित नव्हते. त्यामुळे हिरुभाई पटेल यांनी अत्यंत थोडक्यात आणि मुद्देसूद भाषण करत अर्थसंकल्प मांडला, जो आजही सर्वात लहान बजेट भाषण म्हणून ओळखला जातो.
या दोन टोकाच्या भाषणांमधून काळानुसार अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत कशी बदलली, हे स्पष्ट होते. आधी अर्थसंकल्प हे संक्षिप्त आणि तांत्रिक स्वरूपाचे असायचे, तर आज ते संपूर्ण अर्थव्यवस्थेचा रोडमॅप बनले आहे. त्यामुळे भाषणांची लांबी वाढली असून प्रत्येक क्षेत्राला स्वतंत्र महत्त्व दिले जाते. आधुनिक काळात बजेट भाषण म्हणजे फक्त आकडेवारी नव्हे, तर सरकारच्या विचारधारेचे प्रतिबिंब असते.
भारताच्या अर्थसंकल्पीय इतिहासाकडे पाहिले तर प्रत्येक भाषण हे त्या काळातील आर्थिक परिस्थितीचे आरसेच ठरले आहे. लहान भाषण असो किंवा मोठे – दोन्हींचे महत्त्व वेगळे आहे. एकाने साधेपणाचा आदर्श दिला, तर दुसऱ्याने व्यापक दृष्टिकोनाची ओळख करून दिली. त्यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ आर्थिक नव्हे, तर ऐतिहासिक महत्त्वाचेही ठरते.