
Rain in Bengaluru and 9 Karnataka Districts : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, राजधानी बंगळूरसह दक्षिण अंतर्गत भागातील ९ जिल्ह्यांमध्ये सोमवारी रिमझिम पाऊस झाला, ज्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. मंगळवारीही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या एक-दोन आठवड्यांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते. पण आता पुन्हा थंडी वाढली आहे. बंगळूर शहरात सोमवारी सकाळी ८.३० वाजता तापमान ४ अंश सेल्सिअसने घसरले होते. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर सुरू झालेला रिमझिम पाऊस रात्रीपर्यंत सुरू होता. रात्रीच्या वेळी तापमान आणखी घसरल्याने थंडी वाढली होती.
दक्षिण अंतर्गत भागातील म्हैसूर, चामराजनगर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, कोडागू, हासनमध्ये थंड वारे वाहत आहेत. तर मलेनाडू भागातील शिवमोग्गा आणि चिकमंगळूरमध्ये पावसाचा अंदाज आहे. पुढील ४८ तास असेच वातावरण राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
किनारपट्टी भागात किमान तापमान १८ ते २२ अंश
किनारपट्टी कर्नाटक आणि उत्तर अंतर्गत भागात थंडी आणि कोरडे हवामान आहे. बीदर, धारवाड, बेळगाव, दावणगेरे, हासन, म्हैसूर येथे किमान तापमान ११-१४ अंश सेल्सिअस आहे. विजयपुरा, गदग, हावेरी, कोप्पळ, कलबुर्गी, रायचूर, चित्रदुर्गा येथे किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअस आहे. तर किनारपट्टी भागात किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस आहे.