
ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार पूर्ण होणे हा रुग्णांसाठी मोठा दिलासा असतो. पण याचा अर्थ कॅन्सरचा धोका कायमचा टळला असा होत नाही. तुमचे सर्व फॉलो-अप स्कॅन नॉर्मल असले आणि तुम्हाला निरोगी वाटत असले, तरीही काही महिन्यांनी किंवा वर्षांनी ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा उलटू शकतो. अर्थात, कॅन्सरवर मात केलेल्या प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत असे घडत नाही. हा धोका मूळ कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज, हार्मोन रिसेप्टर स्टेटस आणि घेतलेले उपचार यावर अवलंबून असतो.
काही महिलांमध्ये हा कॅन्सर पुन्हा स्तनात किंवा आजूबाजूच्या भागात उद्भवतो. तर काहींमध्ये तो हाडे, फुफ्फुसे, यकृत (लिव्हर) किंवा मेंदूपर्यंत पसरू शकतो. म्हणूनच, उपचारानंतरही आपल्या शरीरात होणारे बदल ओळखून त्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते.
जेव्हा कॅन्सर त्याच स्तनात किंवा शस्त्रक्रिया केलेल्या जागेजवळील त्वचा आणि पेशींमध्ये पुन्हा होतो, तेव्हा त्याला 'लोकल रेकरन्स' म्हणतात. 'रिजनल रेकरन्स'मध्ये काखेतल्या किंवा कॉलरबोनजवळील लिम्फ नोड्समध्ये कॅन्सर पसरतो. तर जेव्हा कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरतो, तेव्हा त्याला 'डिस्टंट रेकरन्स' किंवा मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर असे म्हटले जाते.
हार्मोन रिसेप्टर-पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अनेक वर्षांनीही तो पुन्हा उद्भवू शकतो. याच कारणामुळे, रुग्णाचा धोका आणि उपचारांची पद्धत लक्षात घेऊन काहींना पाच ते दहा वर्षे हार्मोन थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो.
कॅन्सर शरीराच्या कोणत्या भागात पुन्हा झाला आहे, यावर त्याची लक्षणे अवलंबून असतात. उपचारानंतर शरीरात दिसणारे नवीन आणि सतत जाणवणारे बदल वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
स्तन किंवा छातीच्या भागात नवीन गाठ येणे, त्वचा जाड होणे, सूज येणे, निप्पलधून स्त्राव येणे किंवा शस्त्रक्रियेच्या खुणेमध्ये बदल दिसल्यास सतर्क राहा. काखेत किंवा कॉलरबोनजवळ गाठ जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर कॅन्सर हाडांमध्ये पसरला असेल, तर पाठ, कंबर किंवा इतर हाडांमध्ये सतत वेदना होऊ शकतात. फुफ्फुसांमध्ये पसरल्यास सतत खोकला येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. यकृतावर परिणाम झाल्यास पोटात सूज येणे, अस्वस्थ वाटणे किंवा त्वचा आणि डोळे पिवळे पडणे असे त्रास होऊ शकतात. याशिवाय सतत डोकेदुखी, दृष्टीमध्ये बदल, अशक्तपणा किंवा झटके येत असतील तर तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
ही लक्षणे कॅन्सर व्यतिरिक्त इतर कारणांमुळेही असू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसली म्हणजे कॅन्सर परत आलाच असे नाही. पण आपले उपचार अनेक वर्षांपूर्वीच संपले आहेत, असा विचार करून या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
नियमित फॉलो-अपमुळे डॉक्टरांना तुमच्या प्रकृतीवर लक्ष ठेवता येते. तसेच उपचारांचे साईड इफेक्ट्स आणि नवीन समस्या वेळीच ओळखता येतात. तुमच्या उपचारांचा इतिहास आणि धोक्याची पातळी यावर तुमचे फॉलो-अप शेड्युल ठरते. ब्रेस्ट कॅन्सरवर मात केलेल्या महिलांना सहसा दरवर्षी मॅमोग्राम करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या महिलांची मास्टेक्टॉमी (स्तन काढण्याची शस्त्रक्रिया) झाली आहे, त्यांना त्यांच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागू शकतात.
कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना सहसा संपूर्ण शरीराचे स्कॅनिंग करण्याचा सल्ला दिला जात नाही. त्याऐवजी, स्तनांची योग्य तपासणी आणि नवीन लक्षणे दिसल्यास त्यावरील चाचण्यांवर जास्त भर दिला जातो.
तुमच्या मूळ आजाराचे निदान, उपचार आणि फॉलो-अपच्या तारखांची नोंद ठेवा. तुमची शेवटची तपासणी नॉर्मल असली, तरीही एखादा त्रास सतत जाणवत असेल तर डॉक्टरांना नक्की सांगा. शरीरात काही संशयास्पद बदल दिसल्यास पुढच्या अपॉइंटमेंटची वाट पाहत बसू नका.
ब्रेस्ट कॅन्सरवर मात केल्यानंतरही दीर्घकाळ आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे असते. आपल्या शरीरासाठी काय सामान्य आहे हे समजून घेणे आणि काही बदल जाणवल्यास त्वरित पावले उचलणे, यामुळे कॅन्सर पुन्हा उद्भवल्यास त्यावर वेळेत उपचार करणे शक्य होते.
डॉ. सचिन शेखर बिस्वाल, कन्सल्टंट - मेडिकल ऑन्कोलॉजी, मणिपाल हॉस्पिटल, भुवनेश्वर