
विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी 'मस्ती 4' मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. सध्या ते सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच त्यांनी एक असा किस्सा सांगितला, जो ऐकून सगळेच घाबरले. विवेकने राजस्थानमध्ये त्याच्या 'रोड' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या एका अपघाताची आठवण सांगत धक्कादायक खुलासा केला.
याबद्दल बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला, 'मी राजस्थानमध्ये रोड सिनेमाचं शूटिंग करत होतो. आम्ही बिकानेरवरून जैसलमेरला जात होतो. सुंदर रस्ते, सुंदर ड्राइव्ह, पण रात्रीची वेळ होती. मी ड्रायव्हरला कमीतकमी 15 ते 20 वेळा गाडी हळू चालवायला सांगितलं होतं, 'रात्र आहे, स्पष्ट दिसत नाहीये, हळू चालव'. मी पुढच्या सीटवर बसलो होतो आणि त्या घटनेनंतर मी कधीच पुढच्या सीटवर बसलो नाही. मी माझी सीट मागे झुकवली आणि अचानक एक मोठा अपघात झाला. रस्त्यावर अचानक एक उंटाची गाडी आली, ज्यावर सळ्या होत्या. त्या सळ्यांनी गाडीची पुढची काच तोडली आणि जर माझी सीट सरळ असती, तर त्या सळ्या माझ्या शरीरात घुसल्या असत्या. मी गाडीतून बाहेर पडू शकलो नाही कारण सळ्या माझ्यावर होत्या, पण मला काहीही दुखापत झाली नाही. त्यावेळी मला असं वाटलं की, मी जवळजवळ मेलोच होतो. त्यानंतर, मी रात्री प्रवास न करण्याचा निर्णय घेतला.'
आणखी एक घटना आठवताना विवेक म्हणाला, 'नंतर, जेव्हा मी एका ड्रायव्हरसोबत होतो, तेव्हा त्यानेही असंच केलं. तो खूप वेगाने गाडी चालवत होता, म्हणून मी त्याला गाडी थांबवून वॉशरूमला जाण्यास सांगितलं. मग जेव्हा मी त्याच्याजवळ आलो, तेव्हा मी त्याच्याकडून चावी घेतली आणि त्याला तिथेच सोडून गाडी चालवत निघून गेलो.' 'रोड' हा सिनेमा 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात विवेकसोबत अंतरा माळी आणि मनोज बाजपेयी यांच्याही मुख्य भूमिका होत्या. विवेकच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच 'मस्ती 4' या सिनेमात दिसणार आहे, जो 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित होईल.