
Dadasaheb Phalke Award: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक, मोहनलाल यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली असून, त्यांच्या अतुलनीय योगदानाचा हा मोठा सन्मान आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार असलेल्या मोहनलाल यांनी आतापर्यंत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोहनलाल हे फक्त अभिनेतेच नाही तर दिग्दर्शक, निर्माता आणि प्लेबॅक सिंगर देखील आहे. त्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. या महान कलाकाराने केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही भारतीय सिनेमाला समृद्ध केले आहे. त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
मोहनलाल यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नऊ केरळ राज्य पुरस्कार, तसेच फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, पद्मश्री (2001) आणि पद्मभूषण (2019) यांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनय कौशल्यासाठी तसेच भारतीय चित्रपटसृष्टीवरील त्यांचा अमूल्य योगदान यासाठी त्यांना भारत सरकारने हे प्रतिष्ठित नागरी सन्मान प्रदान केले आहेत.
मोहनलाल हे बहुभाषिक अभिनेता आहेत आणि मलयाळमशिवाय हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांतील चित्रपटांमध्येही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या काही प्रमुख चित्रपटांमध्ये 'दृश्यम' (और 'दृश्यम 2'), 'किरीडम', 'भरतम', 'मणिचित्राथाझु' यांचा समावेश होतो ज्या चित्रपटांनी केवळ व्यावसायिक यशच नाही तर समीक्षकांचा देखील पाठिंबा मिळवला आहे.
हा पुरस्कार येत्या २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना प्रदान केला जाईल. भारतीय सिनेमातील त्यांच्या योगदानाला मिळालेली ही पोचपावती खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे.