
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना २३ सप्टेंबर रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाईल, पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले. मल्याळम इंडस्ट्रीचे सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान मानला जातो आणि तो त्यांना २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिळेल.
मोहनलाल यांनी आपल्या चार दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे, ज्यामुळे त्यांना 'कंप्लीट ॲक्टर' ही पदवी मिळाली आहे. त्यांनी मल्याळमसोबतच तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही उत्कृष्ट काम केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या घोषणेसोबतच मोहनलाल यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला पिढ्यांसाठी प्रेरणादायी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोहनलाल यांना हा मोठा सन्मान मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मोहनलाल यांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून असलेले योगदान भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य आहे आणि हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचा आणि प्रतिभेचा सन्मान आहे.
मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत करतो.
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेते झाले, परंतु मल्याळम सिनेमाचा ‘कंप्लीट अॅक्टर’ म्हणून ओळखले जाणारे मोहनलाल हे नाव वेगळे ठरते. त्यांचा प्रवास केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे.
मोहनलाल विश्वनाथन नायर यांचा जन्म २१ मे १९६० रोजी केरळमधील एलंतुर, पथानमथिट्टा जिल्ह्यात झाला. वडील पोलिसात कार्यरत तर आई गृहिणी होत्या. शिक्षण काळातच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. शाळा आणि महाविद्यालयीन नाटकांतून त्यांनी आपली कला दाखवली.
१९७८ साली थिरानोट्टम या चित्रपटातून त्यांची एंट्री झाली. १९८० च्या दशकापासून ते आजतागायत त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये शंभराहून अधिक चित्रपट केले आहेत. इरुपथम नूट्टांडी, किरिडम, वनप्रस्थम, स्पडिक्कम यांसारखे चित्रपट त्यांच्या अभिनय कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरले. त्यांच्या भूमिकांमध्ये अॅक्शन, रोमँस, कॉमेडी आणि गंभीर अशा सर्व छटा दिसतात.
मोहनलाल यांचा अभिनय साधा, नैसर्गिक आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. भावनांची सूक्ष्म अभिव्यक्ती आणि सहज संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे त्यांना ‘द कम्प्लीट अॅक्टर’ ही उपाधी मिळाली आहे.
मोहनलाल यांचे लग्न सुचित्रा यांच्याशी झाले असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. अभिनयाबरोबरच त्यांना संगीत, वाचन, नाटक आणि सामाजिक कार्याचीही आवड आहे.
मोहनलाल फक्त केरळचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे स्टार आहेत. त्यांचे चाहते जगभर पसरलेले आहेत. त्यांच्या साधेपणामुळे आणि मेहनतीमुळे ते लोकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून बसले आहेत.