
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीशी संबंधित चार गुंड पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. तर या टोळीचा म्होरक्या रवींद्र पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे.
पोलीस आणि एसओजीच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुनका-बिहारीपूर रस्त्यावरील किच्छा नदीच्या पुलावर सापळा रचून दोन गुंडांना पकडले. यामध्ये राजस्थानचा रहिवासी रामनिवास आणि हरियाणाचा रहिवासी अनिल यांचा समावेश आहे. चकमकीदरम्यान रामनिवासच्या पायाला गोळी लागली. दोघेही नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते, त्यांना अटक करण्यात आली. रामनिवासवर २५ हजार रुपयांचे बक्षीसही होते.
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी बागपत येथील दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. दोघांनाही सोशल मीडियाद्वारे टोळीत सामील करून घेण्यात आले होते. टोळीचा सदस्य अरुण याने त्यांना अभिनेत्रीच्या घरावर गोळीबार करण्याचे काम दिले होते, असा आरोप आहे. यासाठी ४ ते ५ लाख रुपयांमध्ये सौदा ठरला होता.
दिल्ली पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, दोन्ही अल्पवयीन मुलांनी ११ सप्टेंबरच्या सकाळी दिशा पाटनीच्या घरावर पहिल्यांदा २-३ गोळ्या झाडल्या, पण कुटुंबाला याची कल्पनाही आली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टोळीचा म्होरक्या रवींद्र आणि त्याच्या साथीदाराने १०-१५ राऊंड फायरिंग केली. या घटनांबाबत बरेली पोलिसांनी एकच एफआयआर दाखल केला आहे.
टोळीचा म्होरक्या रवींद्र पोलीस चकमकीत मारला गेला. पोलिसांच्या तपासात उघड झाले की, पहिल्यांदा रेकीसाठी रामनिवासला पाठवण्यात आले होते, पण त्याने योग्य घर ओळखले नाही. त्याच्या या चुकीमुळे रवींद्र संतापला आणि त्याने त्याला टोळीतून काढून टाकण्याचा आदेश दिला. याच चुकीमुळे रामनिवासचा जीव वाचला.
सोनीपतमधून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि हॉटेल आयडीच्या माध्यमातून पोलिसांनी पाचवा आरोपी रामनिवासची ओळख पटवली. तपासात समोर आले की, गुंडांनी १० सप्टेंबर रोजी बरेलीमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी तो झुमका चौकात थांबून झोपी गेला आणि नंतर साथी शूटर्सपासून वेगळा झाला.
बागपतच्या दोन्ही अल्पवयीन शूटर्सवर एडीजी झोन रमित शर्मा यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बरेली पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून दोघांचे बी वॉरंट घेण्याची तयारी सुरू केली आहे. पोलीस कोठडीत घेऊन पोलीस त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील.