
रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून तो चर्चेत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लेह लडाखमध्ये सुरू आहे. दरम्यान, चित्रपटाच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेटवर काम करणाऱ्या जवळपास १२० क्रू मेंबर्सना लेहच्या एका रुग्णालयात त्वरित दाखल करावे लागले. सर्वांना फूड पॉयझनिंग झाले होते. सध्या चित्रीकरण थांबवण्यात आले असून घटनेची चौकशी सुरू आहे.
'धुरंधर'च्या सेटवर घडलेल्या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी लेह येथे एका बॉलिवूड चित्रपटाच्या क्रूतील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना जेवण केल्यानंतर पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीची तक्रार झाली. त्यांना तातडीने लेहच्या सजल नर्बू मेमोरियल (एसएनएम) रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी फूड पॉयझनिंगची पुष्टी केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्या ठिकाणी जवळपास ६०० लोकांनी जेवण केले होते. रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यापैकी बहुतेकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' चित्रपटाचा धमाकेदार टीझर जुलैमध्ये प्रदर्शित झाला होता. टीझरला सोशल मीडियावर खूप पसंत करण्यात आले. यामध्ये रणवीरचा एकदम वेगळा लूक पाहायला मिळाला. चित्रपटात संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. चित्रपट एका गुप्तहेर एजंटच्या कथेवर आधारित आहे. चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.