
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बहुमोल ठेवा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी निधन झाले. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
सैन्य, इंडियन ऑइल आणि नंतर अभिनय
अच्युत पोतदार यांनी आपल्या आयुष्यात अनेक क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावली. भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर सेवा केल्यानंतर ते इंडियन ऑइल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मात्र, अभिनयाची आवड मनात असल्याने त्यांनी 1980 च्या दशकात सिनेसृष्टीकडे वळत चार दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर आपली छाप पाडली.
125 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत अच्युत पोतदार यांनी 125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्ध सत्य', 'तेजाब', 'परिंदा', 'राजू बन गया जेंटलमन', 'दिलवाले', 'रंगीला', 'वास्तव', 'भाई', 'दबंग 2' आणि मराठी 'व्हेंटिलेटर' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांच्या अभिनयाची दखल घेण्यात आली.
‘3 इडियट्स’मधील अविस्मरणीय भूमिका
राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या '3 इडियट्स' या सुपरहिट चित्रपटात त्यांनी प्राध्यापकाची भूमिका साकारली. 'क्या बात है' आणि 'कहना क्या चाहते हो?' हे त्यांचे डायलॉग्स आजही लोकांच्या लक्षात राहिले असून सोशल मीडियावर मीम्ससाठी ते प्रचंड लोकप्रिय आहेत.
छोट्या पडद्यावरील कार्य
सिनेमासोबतच अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावर देखील आपला ठसा उमटवला. 'वागले की दुनिया', 'माझा होशील ना', 'मिसेस तेंडुलकर' आणि 'भारत की खोज' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यांच्या बहुमुखी प्रतिभेमुळे ते छोट्या आणि मोठ्या पडद्यावर सारखेच गाजले.तर अच्युत पोतदार यांनी आपल्या मेहनतीने आणि साधेपणाने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.