
बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटात तिच्या सशक्त आणि धाडसी भूमिकेमुळे तिचं कौतुक होत असतानाच, आता हा चित्रपट सेंसर बोर्डाच्या कचाट्यात सापडला आहे. चित्रपटातील एक नग्न दृश्य ‘फ्रंटल न्यूडिटी’ म्हणून हटवण्याचे आदेश केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) दिले आहेत. या निर्णयामुळे कलावंत आणि प्रेक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
‘सिस्टर मिडनाइट’ चित्रपटात राधिकाने उमाच्या भूमिकेत एका बंडखोर, सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महिलेचं चित्रण केलं आहे. या भूमिकेत तिने मानसिक, सामाजिक आणि लैंगिक जखमा मोकळेपणाने मांडल्या आहेत. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही प्रदर्शित झाला होता, आणि तिथे तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. मात्र भारतात सेंसर बोर्डाने त्यातील काही दृश्यांवर गंडांतर आणले आहे. विशेषतः नग्न दृश्य आणि कथनातील काही स्वैर भाषेवर आक्षेप घेतला आहे.
चित्रपटाला ‘ए’ (A) प्रमाणपत्र देताना सेंसर बोर्डाने १५ पेक्षा जास्त बदल सूचवले आहेत. त्यात दृश्य हटवणे, संवाद म्युट करणे आणि काही दृश्यांची लांबी कमी करणे यांचा यामध्ये समावेश आहे. ‘स्वैर शब्द’ आणि ‘धार्मिक सूचकता’ यावरही बंधनं घातली गेली. निर्माते आणि कलाकारांचं म्हणणं आहे की, हे दृश्य अत्यंत संवेदनशील पद्धतीने दाखवण्यात आलं होतं आणि कथानकात त्याचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे हे कापल्यास मूळ आशयच धूसर होत आहे.
राधिका आपटेने यापूर्वीही अनेक धाडसी भूमिका केल्या आहेत. तिच्या अभिनयशैलीला गंभीरतेने घेणारे प्रेक्षक भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर आहेत. यावेळीही तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली असली, तरी भारतात सर्जनशीलतेवर लादल्या जाणाऱ्या बंधनांमुळे कलाकारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. “एक कलाकार म्हणून जेव्हा तुमच्या अभिव्यक्तीच्या मर्यादा ठरवल्या जातात, तेव्हा ते फक्त चित्रपटासाठी नव्हे तर समाजासाठी धोक्याचे संकेत असतात,” असं राधिकान मत व्यक्त केलं आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक करण कंधारी यांनी स्पष्ट केलं की, हे दृश्य केवळ उत्तेजनासाठी नव्हते, तर एका महत्त्वाच्या मानसिक अवस्थेचं प्रतीक होतं. त्याचा कथानकात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. “जर हे दृश्य हटवलं, तर प्रेक्षकाला उमाच्या संघर्षाचा पूर्ण अर्थ समजणार नाही,” असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कलावंतांकडून आणि काही प्रेक्षकांकडूनही 'क्रिएटिव्ह कंट्रोल'विरोधात आवाज उठवण्यात येत आहे.
या वादातून पुन्हा एकदा भारतात चित्रपट सर्जनशीलतेवर असलेलं निर्बंधित वातावरण समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपट कौतुकास्पद ठरत असतानाच देशांतर्गत सेन्सॉरशिपमुळे त्यांना पूर्णत्व मिळत नाही. ही घटना हे दाखवते की, अजूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सीमारेषा आखल्या जात आहेत आणि कला-संवेदनशीलतेचा स्वीकार व्यापक स्तरावर होण्यासाठी भारताला अजून वाटचाल करावी लागणार आहे.
अभिनेत्री राधिका आपटे ही तिच्या बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये सामाजिक, मानसिक आणि लैंगिक विषयांवर आधारित भूमिका साकारल्या आहेत. तिच्या फिल्मोग्राफीत काही असे चित्रपट आहेत ज्यामध्ये तिने नग्न दृश्ये दिली असून त्या भूमिकांमागे नेहमीच सशक्त कथा आणि कलात्मक कारण असलेले दिसते. "पार्च्ड" या २०१५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात राधिकाने बिनधास्त अभिनय करत लैंगिकतेवर भाष्य करणारी भूमिका साकारली होती. यामध्ये तिने काही नग्न दृश्ये दिली असून त्या दृश्यांचा उद्देश महिला लैंगिकतेचा स्वाभाविक भाग म्हणून सादर करणे हा होता.
त्याचप्रमाणे "क्लीन शेव्हन" या शॉर्ट फिल्ममध्येही राधिका आपटेने धाडसी अभिनय केला होता. ही लघुपट न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आली होती. तसेच अनुराग कश्यप यांच्या "मैडली" या आंतरराष्ट्रीय अँथोलॉजी चित्रपटातही राधिकाने नग्नता सादर करणारी भूमिका केली होती. राधिकाच्या मते, अशा दृश्यांचा उद्देश केवळ शारीरिक सादरीकरण नसून त्या पात्राची मानसिक स्थिती आणि कथा सांगण्याचा एक मार्ग असतो. त्यामुळे ती अशा भूमिकांकडे केवळ कला म्हणून पाहते.