
मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील एक परिचित चेहरा, ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले आहे. १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, आणि त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा स्मशानभूमीत २० जून, शुक्रवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कारांसाठी आणले जाईल.
विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. रीमा लागू यांचे २०१७ मध्ये निधन झाले होते. विशेष म्हणजे, घटस्फोटानंतरही त्यांच्यात सलोख्याचे नाते कायम होते. अभिनेत्री आणि लेखिका मृण्मयी लागू या विवेक लागू यांच्या कन्या आहेत. मृण्मयीने बॉलिवूडमध्ये 'थप्पड', 'स्कूप' यांसारख्या गाजलेल्या प्रोजेक्ट्सची लेखिका म्हणून ओळख निर्माण केली आहे, तसेच तिने 'मुक्काम पोस्ट लंडन' या चित्रपटात अभिनयही केला होता.
विवेक लागू यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मनोरंजन क्षेत्रांत काम केले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, त्यांच्या कलाकृतींमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या गाजलेल्या कामांमध्ये टीव्ही चित्रपट 'गोदावरीने काय केले' (२००८), 'अग्ली' (२०१३), 'व्हॉट अबाउट सावरकर' (२०१५), '३१ दिवस' (२०१८) या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. तसेच, 'चार दिवस सासूचे' आणि 'हे मन बावरे' या त्यांच्या मालिकाही प्रचंड गाजल्या होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
विवेक लागू आणि रीमा लागू (लग्नापूर्वीचे नाव नयन बडबडे) यांची भेट बँकेतील नाट्यस्पर्धांदरम्यान झाली होती. रीमा त्यावेळी बँकेत नोकरी करत होत्या, जिथे कलाकारांसाठी विशेष कोटा होता. विवेक २३ वर्षांचे होते आणि नयन १८ वर्षांच्या. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, १९७८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. जवळपास तीन दशके त्यांचा संसार सुखकर चालला, मात्र काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात कटुता येऊन मतभेद वाढले आणि त्यांचा घटस्फोट झाला. तरीही रीमा यांनी 'रीमा लागू' हेच नाव कायम ठेवले, जे त्यांच्यातील आदराचे आणि सलोख्याचे प्रतीक होते.