
हेरा फेरी ३ चित्रपटाच्या वादाआधीच प्रसिद्ध अभिनेते परेश रावल एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत असा दावा केला की, त्यांनी आपल्या दुखापतीवर उपचार म्हणून सकाळची लघवी पिली होती आणि ती बिअरसारखी प्यायल्याच त्यांनी म्हटलं होतं. हे विधान समाज माध्यमात आल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.
लोकांच्या प्रतिक्रियांवर उत्तर देताना परेश रावल म्हणाले की, “मी कुणालाही ते प्यायला लावले नाही किंवा त्यांना ऑफरही केले नाही, तरीही लोक नाराज आहेत. त्यांना वाटते की मी एकटाच पिलो आहे!” अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना फटकारले. त्यांनी हे विधान विनोदी आणि थेट भाषेत केल्याने त्यावर अधिकच चर्चा रंगली.
परेश रावल यांनी स्पष्ट केले की ही घटना ४० वर्षांपूर्वीची आहे. “मी माझ्या अनुभवातून ही गोष्ट शेअर केली. लोकांना छोट्या गोष्टी मोठ्या करण्यात मजा वाटते, त्यांना मजा घेऊ द्या,” असे म्हणत त्यांनी या वादाला थोडक्यात उत्तर दिले आहे. त्यांनी ही गोष्ट एका वास्तव अनुभवाच्या स्वरूपात सांगितली होती.
द लल्लनटॉप या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘घातक’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तेव्हा ते नानावटी रुग्णालयात उपचार घेत होते. याचवेळी अजय देवगन यांचे वडील वीरू देवगन रुग्णालयात आले होते. त्यांनी परेश रावल यांना एक वेगळाच सल्ला दिला.
परेश रावल यांनी सांगितले की, वीरू देवगन यांनी त्यांना सकाळी उठल्यावर लघवी पिण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, “सर्व लढवय्ये असेच करतात. तुला कधीच त्रास होणार नाही.” शिवाय, दारू, मटण आणि तंबाखू टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला, जो परेश रावल यांनी मान्य केला.
परेश रावल यांनी पुढे सांगितले की, त्यांनी १५ दिवस सकाळी लघवी घेतली आणि त्याचा सकारात्मक परिणाम झाला. जेव्हा एक्स-रे रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. एक्स-रेमध्ये पांढरा थर दिसत होता, ते बरे होण्याचे लक्षण होते. त्यांनी सांगितले की, ही पद्धत वापरल्यामुळे त्यांची दुखापत अपेक्षेपेक्षा लवकर बरी झाली.