
महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या शोने ब्रेक घेतला होता आणि त्याच्या जागी सध्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) शो दाखवला जात आहे. मात्र आता १४ ऑगस्टपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नवीन पर्वासह सुरू होणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता हा शो प्रसारित होणार आहे. नुकताच या शोचा नवीन प्रोमो रिलीज झाला असून, त्यामध्ये दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौगुले आणि वनीता खरात हे कलाकार दिसत आहेत. ‘सहकुटुंब हसू या’ या घोषणा देत शो पुन्हा प्रेक्षकांना पोटधरून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधील कलाकार सध्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तिथे मराठी प्रेक्षकांसमोर त्यांनी धमाल परफॉर्मन्स करत खळखळून हसवलं. प्रेक्षकांनीही त्यांच्या विनोदाचा मनमुराद आनंद घेतला. या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. यामधून त्यांच्या परदेशातील अनुभवांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हास्य आणि मनोरंजनाचा हा प्रवास आता पुन्हा १४ ऑगस्टपासून सोनी मराठीवर सुरू होणार आहे.