
सध्या भारतीय सिनेसृष्टीत पॅन इंडिया सिनेमांचा ट्रेंड जोरात सुरू आहे. एकच सिनेमा पाच-सहा भाषांमध्ये रिलीज करणं आता खूप कॉमन झालंय. मोठ्या बजेटचे सिनेमे तर दहा-चौदा भाषांमध्येही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण या सगळ्यात, केवळ कंटेंटवर विश्वास ठेवून येणारे छोटे सिनेमेही प्रेक्षकांची मनं जिंकून नवे रेकॉर्ड बनवत आहेत.
सिनेमा हिट व्हायचा असेल तर तगडं बजेट, स्टार हिरो-हिरोईन आणि जोरदार प्रमोशन असायलाच हवं, असा अनेकांचा समज असतो. पण जर गोष्ट चांगली असेल आणि कंटेंट प्रेक्षकांना भावणारा असेल, तर कोणत्याही मोठ्या हायपशिवाय सिनेमा बॉक्स ऑफिसवर कल्ला करू शकतो, हे अनेक सिनेमांनी सिद्ध करून दाखवलंय.
अशाच सिनेमांच्या यादीत कन्नडच्या 'मुंगारू मळे' (Mungaru Male) सिनेमाचं नाव आवर्जून घेतलं जातं. २००६ मध्ये जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा त्याकडून फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या किंवा त्याची हवाही नव्हती. गोल्डन स्टार गणेश आणि पूजा गांधी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात कोणतीही मोठी स्टारकास्ट नव्हती. पण सिनेमा रिलीज झाला आणि सगळंच चित्र बदलून गेलं.
'माउथ पब्लिसिटी'ने वाढवली सिनेमाची क्रेझ
'मुंगारू मळे' बघून आलेल्या प्रेक्षकांनी दिलेल्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे सिनेमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढत गेली. एकाकडून दुसऱ्याकडे सिनेमाचं कौतुक पोहोचलं आणि प्रेक्षकांनी थेट थिएटरकडे धाव घेतली. अशा प्रकारे, कोणत्याही मोठ्या प्रमोशनशिवाय केवळ 'माउथ पब्लिसिटी'च्या जोरावर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवलं.
तब्बल ४६० दिवस थिएटरमध्ये मुक्काम!
'मुंगारू मळे'ने रचलेल्या मोठ्या रेकॉर्ड्सपैकी एक म्हणजे त्याची थिएटर्समधील घोडदौड. हा सिनेमा तब्बल ४६० दिवस थिएटरमध्ये चालला होता. विशेष म्हणजे मल्टिप्लेक्समध्येही सिनेमाला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. बंगळुरूच्या पीव्हीआर (PVR) मध्ये हा सिनेमा वर्षभरापेक्षा जास्त काळ चालला होता. त्या काळात कन्नड सिनेसृष्टीत ही खूप मोठी गोष्ट होती. मोठा स्टार किंवा बजेट नसतानाही एखादा सिनेमा इतका काळ थिएटरमध्ये टिकून राहिल्याने संपूर्ण सिनेसृष्टीच अवाक् झाली होती.
बजेट फक्त ७० लाख.. पण कमाई कोटींमध्ये!
रिपोर्ट्सनुसार, 'मुंगारू मळे' सिनेमा फक्त ७० लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. जगभरात या सिनेमाने तब्बल ७५ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. कमी बजेटमध्ये बनूनही सर्वात मोठा इम्पॅक्ट पाडणाऱ्या कन्नड सिनेमांमध्ये 'मुंगारू मळे'चं नाव टॉपवर येतं.
कथा, प्रेम आणि भावना हीच सिनेमाची ताकद
'मुंगारू मळे'च्या यशाचं मुख्य कारण म्हणजे सिनेमाची कथा आणि मांडणी. मारधाड, स्टार इमेज किंवा अती ग्लॅमर यापेक्षा प्रेम आणि भावनांना केंद्रस्थानी ठेवून हा सिनेमा बनवला होता. प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवणारी कथा, काळजाला भिडणारी गाणी आणि कलाकारांचा अभिनय यामुळे सिनेमाला मोठी ताकद मिळाली. म्हणूनच तरुणाईसोबतच फॅमिली ऑडियन्सनेही या सिनेमाला डोक्यावर घेतलं.
'मुंगारू मळे'ची क्रेझ फक्त पहिल्या भागापुरती मर्यादित राहिली नाही. पहिला भाग रिलीज झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी, २०१६ मध्ये 'मुंगारू मळे २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या सिनेमाचं यश आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा यामुळे या सिक्वेलबद्दलही मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
मोठा स्टार नाही, तगडं बजेट नाही, प्रमोशनचा गाजावाजा नाही... तरीही एका कन्नड सिनेमाने केवळ प्रेक्षकांच्या 'माउथ पब्लिसिटी'वर मोठं यश मिळवणं आणि ४६० दिवस थिएटरमध्ये चालणं, हा खरोखरच एक दुर्मिळ रेकॉर्ड आहे. याच कारणामुळे, जेव्हा जेव्हा कन्नड सिनेसृष्टीतील यशस्वी सिनेमांची चर्चा होते, तेव्हा 'मुंगारू मळे'चं नाव आजही आवर्जून घेतलं जातं.