राज ठाकरेंचा पाकिस्तानी चित्रपट 'लिजेंड ऑफ मौला जट' ला विरोध

राज ठाकरे यांनी ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ या पाकिस्तानी चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनाला विरोध दर्शविला. पाकिस्तानसोबतचे तणावपूर्ण संबंध लक्षात घेता सांस्कृतिक देवाणघेवाण योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे

Rameshwar Gavhane | Published : Sep 22, 2024 8:21 AM IST / Updated: Sep 22 2024, 01:55 PM IST

फवाद खान आणि माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असलेला पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा कडक इशारा दिला आहे. . 2 ऑक्टोबरला प्रीमियर होणार असून, भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट एका दशकात पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरणार असताना राज ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे.

दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध पाहता पाकिस्तानसोबत सांस्कृतिक देवाणघेवाण खपवून घेतली जाऊ नये, असा दावा करत ठाकरे यांनी पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यावर टीका केली. काय म्हणालेत राज ठाकरे ते आपण पाहूयात.

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?

आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.

अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.

या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका.

हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे.

त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये.

कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.

 

 

आणखी वाचा :

वर्षा ताईंना ओळखत नाही : निकी तांबोळीच्या वक्तव्यामुळे बिग बॉसच्या घरात गोंधळ

 

Share this article