
मुंबई : कॅनडामधील सरे (ब्रिटिश कोलंबिया) येथे असलेल्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘Kap's Cafe’ या आलिशान हॉटेलवर बुधवारी रात्री गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या हल्ल्यामागे कोण आहे आणि कपिल शर्माचे कोणाशी वैर आहे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
या घटनेची जबाबदारी जर्मनीस्थित खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) च्या सदस्याने घेतली आहे. रजीत सिंग लड्डी या दहशतवाद्याने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे हल्ला करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्यानुसार कपिल शर्माच्या शोमधील एका भागात निहंग शिखांच्या पोशाख आणि वर्तनावर विनोदी टिप्पणी करण्यात आल्याचा त्याला आक्षेप होता.
लड्डीने दावा केला की, त्यांनी कपिलच्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.यामुळे कपिल शर्माने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्याने आपल्या पोस्टमध्ये केली होती. या पोस्टचा हवाला देत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हल्लेखोराने कारमधून येत पिस्तूलमधून बेधडक गोळीबार केला आणि लगेचच पळ काढला. स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू असून, कपिल शर्मा किंवा त्याच्या पत्नी गिन्नी चतरथ यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
हरजीत सिंग लड्डी कोण?
हरजीत सिंग लड्डी हा पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यातील गरपधाना गावाचा रहिवासी आहे. तो एनआयए (NIA) च्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे. 2023 मध्ये विहिंप नेते विकास प्रभाकर यांच्या हत्येसह अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये त्याला अटक करण्यासाठी एनआयएने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
लड्डीशी संबंधित असलेली बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) ही खलिस्तानी संघटना UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी गट म्हणून घोषित करण्यात आली आहे.कपिल शर्माच्या कॅफेवर झालेला हल्ला आणि त्यामागचे खलिस्तानी कनेक्शन हे अत्यंत गंभीर असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.