
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. पण रिलीजपूर्वी चित्रपट वादात सापडला आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटावर कायदेशीर व्यवसायाचे चुकीचे चित्रण करणे आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडविल्याचा आरोप आहे. पुण्याच्या एका न्यायालयाने अक्षय आणि अरशद यांना २८ ऑगस्ट २०२५ रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. खरंतर, पुण्यातील वकील वाजद खान, भारत बिडकर आणि गणेश म्हास्के यांनी या चित्रपटविरुद्ध याचिका दाखल केली आहे.
वाजद खान, भारत बिडकर आणि गणेश म्हास्के यांनी न्यायालयाकडे 'जॉली एलएलबी ३' वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी चित्रपटात कायदेशीर व्यवसायाचे अपमानास्पद चित्रण आणि न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. तसेच एका संवादात न्यायाधीशांसाठी वापरलेल्या 'मामू' या शब्दावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने याचिकेवर विचार करताना अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांना नोटीस पाठवून न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
भारत बिडकर यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "'जॉली एलएलबी ३' चा टीझर प्रदर्शित झाला आहे आणि अक्षय कुमार आणि अरशद वारसी हे वकीलांचा बॅण्ड घालून हा चित्रपट प्रमोट करत आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये वकिलांची प्रतिमा मलिन झाली आहे आणि चित्रपटात कायदेशीर व्यवसायाचा अपमान करण्यात आला आहे. म्हणूनच आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. न्यायाधीश जे.जी. पवार यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि कलाकारांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे."
'जॉली एलएलबी ३' १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर आहेत. आलोक जैन आणि अजित अंधेरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्याशिवाय सौरभ शुक्ला, अमृता राव, हुमा कुरेशी, अन्नू कपूर आणि बोमन इराणी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या 'जॉली एलएलबी' आणि २०१७ मध्ये आलेल्या 'जॉली एलएलबी २' चा सिक्वेल आहे.