
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून त्यांच्या निधनाच्या अफवा पसरत आहेत. यावर विश्वास ठेवून अनेक सेलिब्रिटींनी शोकही व्यक्त केला होता. माध्यमांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक असून ते बरे होत आहेत, असं त्यांची पत्नी, अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल यांच्यासह कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अफवा न पसरवण्याची विनंती केली. दुसऱ्यांदाही हीच बातमी पसरल्यावर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती.
89 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ते घरीच उपचार घेत आहेत. दरम्यान, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची बातमी पसरत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही, पण काहींना अटक झाल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे, हॉस्पिटलच्या आतून देओल कुटुंबाला दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हायरल व्हिडिओमध्ये धर्मेंद्र ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये बेडवर झोपलेले दिसत आहेत. ते बेशुद्ध अवस्थेत दिसत असून, त्यांचे मुलगे बॉबी देओल आणि सनी देओल यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य दुःखाने तिथे उभे असलेले दिसत आहेत. सनी देओलचे मुलगे करण देओल आणि राजवीर देओल हे देखील या क्लिपमध्ये दिसत आहेत.
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यादेखील तिथे होत्या. देओल कुटुंबाचा हा खासगी क्षण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले आहे.