
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांसारख्या कलाकारांनी सजलेल्या 'धुरंधर' या स्पाय ॲक्शन चित्रपटासमोर सर्व रेकॉर्ड्स फिके पडत आहेत. विशेषतः दुसऱ्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने मोठी कमाल केली आहे. होय, पहिल्याच आठवड्यात भारतात २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा 'धुरंधर' दुसऱ्या वीकेंडमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा २: द रुल'च्या हिंदी व्हर्जनला मागे टाकले आहे, जो आतापर्यंत या यादीत अव्वल होता. दिग्दर्शक सुकुमार यांचा 'पुष्पा २' आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी X वर दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या कमाईचे ताजे आकडे शेअर केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "वीकेंड २ निकाल: 'धुरंधर' हा 'पुष्पा २', 'छावा' या सर्व चित्रपटांना मागे टाकत नं. १ चित्रपट बनला आहे. बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक क्षण. धुरंधरने एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे." यानंतर त्यांनी दुसऱ्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांची यादी दिली आहे, जी खालीलप्रमाणे आहे:-
| रँक | चित्रपट | दुसऱ्या वीकेंडची कमाई |
| 1 | धुरंधर | १४६.६० कोटी रुपये |
| 2 | पुष्पा २ : द रुल (हिंदी व्हर्जन) | १२८ कोटी रुपये |
| 3 | छावा | १०९.२३ कोटी रुपये |
| 4 | स्त्री २ | ९३.८५ कोटी रुपये |
| 5 | गदर २ | ९०.४७ कोटी रुपये |
| 6 | ॲनिमल | ८७.५६ कोटी रुपये |
| 7 | जवान | ८२.४६ कोटी रुपये |
| 8 | बाहुबली २ : द कन्क्लूजन (हिंदी व्हर्जन) | ८०.७५ कोटी रुपये |
| 9 | सैयारा | ७५.५० कोटी रुपये |
| 10 | दंगल | ७३.७० कोटी रुपये |
आदर्श यांनी त्यांच्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये 'धुरंधर'च्या आतापर्यंतच्या कमाईचे आकडे सादर केले आहेत. त्यांच्या पोस्टनुसार, या चित्रपटाने १० दिवसांत एकूण ३६४.६० कोटी रुपये कमावले आहेत. त्यांनी हेही सांगितले आहे की, चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारपासून ते दुसऱ्या रविवारपर्यंत अनुक्रमे ३४.७० कोटी रुपये, ५३.७० कोटी रुपये आणि ५८.२० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने १०६.५० कोटी रुपये आणि पहिल्या आठवड्यात २१८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.