
मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक आणि गीतकार यासर देसाई याने मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंकवर स्टंट करत शूट केलेल्या व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला असून, मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये यासर देसाई आपल्या गाडीतून उतरताना, सी लिंकच्या रेलिंगवर चढताना आणि नंतर त्वरित निघून जाताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेतली.
सी लिंकवर स्टंट्स करण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कृती सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोकादायक आहेत आणि यामध्ये गुन्हा झालेला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि सी लिंक देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यासर देसाई आणि त्याचा सहकारी, ज्याने व्हिडिओ शूट केला होता, यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला.
गायकावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासरवर कलम 285: सार्वजनिक मार्गावर धोका निर्माण करणे, कलम 281: अविचारीपणे वाहन चालवणे, कलम 125: इतरांच्या जीवाला किंवा सुरक्षिततेला धोका, कलम 3(5): एकाच हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले गुन्हेगारी कृत्य. मोटार वाहन कायद्याखालील विविध कलमे
पोलिस अधिकारी म्हटले की, “आम्ही गाडीच्या नोंदणी तपशीलांवरून देसाईचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. एकदा त्याचा शोध लागला की, त्याचे जबाब नोंदवले जाईल आणि त्याला कायदेशीर नोटीस बजावली जाईल.”हा प्रकार हा केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, लोकांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
याआधी वर्ष 2023 मध्ये एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरने सी लिंकवर चालत्या बाईकवर उभं राहून स्टंट करत स्वतःचा व्हिडिओ बनवला होता. त्याने हेल्मेटही घातले नव्हते.सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संबंधित तरुणाला शोधून काढले आणि त्याच्यावर मोटार वाहन कायदा आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उल्लंघनासाठी कारवाई केली होती.
याशिवाय वर्ष 2022 मध्ये एका जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या फोटोशूटसाठी गाडी थांबवून सी लिंकच्या मधोमध फोटो काढले. फोटोग्राफर आणि कपल दोघांनीही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होते. पोलिसांनी यावेळी त्यांना शोधून काढत दंडात्मक कारवाई केली होती.