
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात पहिल्याच आठवड्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कॅप्टन्सी टास्क दरम्यान सदस्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे बिग बॉसला अखेर टास्कची पहिली फेरी रद्द करावी लागली.
एपिसोडच्या सुरुवातीलाच घरात भावनिक लाट पाहायला मिळाली. सागर कारंडेला घराच्या आठवणीने रडू कोसळले, तर दुसरीकडे तन्वी कोलते स्वतःच्या सडेतोड स्वभावामुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांबद्दल बोलताना ओक्साबोक्शी रडली. विशाल आणि राकेशने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण घराचे वातावरण तणावपूर्णच राहिले.
सोनाली राऊतची 'पॉवर की' अचानक गायब झाल्याने घरात खळबळ उडाली. बिग बॉसने ही चावी आधीच वापरली गेल्याचे स्पष्ट करत ती परत करण्याचे आदेश दिले. अखेर ही चावी बाथरुममध्ये सापडली. मात्र, हा चोरीचा प्रकार असल्याचे म्हणत सागर, सचिन आणि आयुष यांनी 'चोर' समोर येत नाही तोपर्यंत जेवण न करण्याचा पवित्रा घेतला. बिग बॉसने या घरगुती वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि सदस्यांना त्यांची 'सीक्रेट्स' एका बॉक्समध्ये लिहिण्यास सांगितले.
कॅप्टन्सीसाठी चौथ्या उमेदवाराची निवड करताना बिग बॉसने मोठी अट घातली. अनुश्रीने बझर वाजवून उमेदवारी तर मिळवली, पण त्याची किंमत घरातील इतर सदस्यांना मोजावी लागली. ४ उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्वांच्या सोयी-सुविधा ५० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या. अर्धे बेड्स, एक बाथरुम आणि एक टॉयलेट लॉक करण्यात आले, ज्यामुळे घरात असंतोष पसरला.
कॅप्टन्सीसाठी रंगलेल्या 'लांडगा आला रे आला' या टास्कमध्ये मैदानाचे रूपांतर कुस्तीच्या आखाड्यात झाले. लोकर गोळा करताना विशाल कोटियन आणि ओमकार राऊत एकमेकांना भिडले. विशालने आपला गळा पकडल्याचा आरोप ओमकारने केला, तर दुसरीकडे तन्वी आणि सोनाली यांच्यातही झटापट झाली. सोनालीने कानशिलात लगावल्याचा खळबळजनक दावा तन्वीने केला.
घरातील वाढती हिंसा आणि राडा पाहून बिग बॉसने तातडीने टास्क थांबवण्याचा निर्णय घेतला. खेळाचे नियम पायदळी तुडवल्यामुळे बिग बॉसने टास्कची पहिली फेरी रद्द केली. इतकेच नाही तर हिंसक वर्तन करणाऱ्या विशाल, आयुष, सागर आणि ओमकार या चौघांनाही या फेरीतून बाद करण्यात आले.