
मुंबई : "मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा" असा वादग्रस्त दावा करणाऱ्या सुशील केडिया यांच्यावर अभिनेता भरत जाधव यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. "इथे येऊन व्यवसाय करता, मराठी माणसांवर जगता, आणि मराठी बोलायला लाज वाटते?" असा सवाल करत त्यांनी मराठी अस्मितेसाठी उघडपणे भूमिका मांडली.
राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादामुळे राज्य सरकारला शासन आदेश मागे घ्यावा लागला. यामुळे मराठी माणसांच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये आयोजित ‘विजय मेळावा’ कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. या ऐतिहासिक क्षणी मराठी अभिनेते, साहित्यिक आणि कलाकारांनीही आपली उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमात सहभागी असलेले अभिनेता भरत जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, "प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. पण आता वेळ आली आहे की, मराठी माणूस जागा झाला पाहिजे, आपली भाषा आणि संस्कृती जपली पाहिजे. मी हिंदीचा विरोध करत नाही, पण कोणतीही भाषा सक्तीने लादली जाऊ नये एवढंच म्हणतो."
‘मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा’ असं म्हणणाऱ्या सुशील केडिया यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भरत जाधव यांनी रोष व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, "तुम्ही इथे येता, धंदा करता, मराठी लोकांवरच जगता मग मराठी बोलायला लाज का वाटते? ३० वर्ष इथे राहूनही अभिमानाने असं बोलणं चुकीचं आहे. हे केवळ भाषेचा अपमान नाही, तर इथल्या लोकांचा, संस्कृतीचा अपमान आहे. मी याचा तीव्र निषेध करतो."
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सध्या निर्माण झालेलं वातावरण हे सामाजिक एकतेचं आणि भाषिक जागृतीचं संकेतचिन्ह बनलं आहे. कलाकार, नेते आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने या चळवळीत सहभाग घेत आहेत.