
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटसृष्टीत आशादायक सकारात्मकता पाहायला मिळतेय. ‘एप्रिल मे ९९’, ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’, ‘जारण’ अशा दमदार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही यशाची कमाई केली आहे आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता उमेश कामतने एका मुलाखतीत यशस्वी मराठी चित्रपटांविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याच्या शब्दांतून प्रेक्षकांविषयी कृतज्ञता आणि चित्रपटसृष्टीतील उमेद दोन्हीही झळकते.
उमेश कामत म्हणतो, "मराठी प्रेक्षक वेळ काढून, पैसा खर्चून, काही अंतर चालून आणि तिकीट काढून चित्रपट पाहायला येत आहेत. याचं खूप समाधान वाटतं. एक काळ होता, जेव्हा सगळीकडे असं म्हटलं जायचं की, मराठी चित्रपट पोहोचत नाहीत किंवा चांगले सिनेमे बनत नाहीत. अशा परिस्थितीत सुद्धा चित्रपट चालत आहेत, हे ऐकून आणि पाहून खूप बरं वाटतं."
उमेशने स्पष्ट सांगितलं की, “अर्थातच अजून परिस्थिती सुधारायला हवी आहे. पण सध्याच्या घडामोडी कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळींसाठी उमेद देणाऱ्या आहेत. जेव्हा प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो, तेव्हा आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते.”
इतर भाषांतील चित्रपटांची तुलना करत उमेशने मार्मिक निरीक्षण मांडले. "आपण नेहमी इतर भाषांतील उदाहरणं देतो, त्यांच्या सिनेमांचं कौतुक करतो – ते योग्यही आहे. पण त्यामुळे आपण स्वतःला कमी लेखण्याचं काहीच कारण नाही. आपण कमी पडतो असं नेहमीच सांगण्याऐवजी, आपण प्रयत्न करायला हवेत, बदल घडवायला हवेत."
उमेश कामतचा आगामी चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या विनोदी चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
सध्याचा काळ मराठी सिनेसृष्टीसाठी उत्साहवर्धक आहे. प्रेक्षकांची गर्दी, उत्तम कंटेंट आणि कलाकारांचा प्रामाणिक प्रयत्न – या सगळ्यांनी मिळून मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा बहरताना दिसतेय.